Congress News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांच्या काँग्रेस पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. विधासनभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून अमित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची जनमानसात असलेली प्रतिमा उंचावण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी आदिवासी समाजातील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करत नेते राहुल गांधी यांनी सगळ्यानाच आश्चर्याचा धका दिला. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विशेषतः महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने चांगला रिझल्ट दिला होता. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाने लढवलेल्या तीनही जागा त्यांनी जिंकल्या होत्या. लातूरचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचा या विजयात मोठा वाटा असल्याचे बोलले गेले.
विशेषतः लातूर (Latur) आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेले यश हे अमित देशमुख यांच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. परंतु लोकसभेनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख यांचीच नाही तर महाविकास आघाडीचीच जादू ओसरल्याचे दिसून आले. महायुतीने काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी या घटक पक्षांना धोबीपछाड दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असलेल्या अमित देशमुख यांचा कसाबसा विजय झाला. लातूर ग्रामीणमध्ये तर त्यांचे बंधू माजी आमदार धीरज देशमुख यांचा पराभव झाला.
त्यानंतर अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे रहायला लागले. राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनपेक्षितपणे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे अमित देशमुख यांच्यासह राज्यातील इतर नेते बॅकफुटला गेले. मात्र आगामी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पहाता पक्षाने अमित देशमुख यांच्यासह काही आमदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवली. मुख्य प्रतोद पदी निवड झाल्यानंतर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून माझ्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवून विश्वास व्यक्त केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खर्गेजी,लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मा.राहुल गांधीजी त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.के.सी. वेणूगोपालजी,पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मा. चेन्नीथालाजी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळजी व इतर मान्यवर नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो.
त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाची ध्येय, धोरणे व्यवस्थित मांडून जनमानसातील पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत राहील.माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील उपनेते म्हणून मा.अमिन पटेल तसेच सचिव म्हणून मा.विश्वजीत कदम आणि प्रतोद म्हणून शिरीशकुमार नाईक, संजय मेश्राम यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व त्यांनाही शुभेच्छा देतो, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.