

तुळजापूरः भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना रोखण्यासाठी काँग्रेसकडुन आता माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांना बळ दिले जात आहे. कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी नुकतीच संधी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षातील चव्हाण यांची राजकीय दृष्टीने प्रगती होण्याचे हे मोठे संकेत मानले जात आहेत.
जिल्ह्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे काँग्रेससाठी असलेले योगदान आणि जनतेसाठी कायम संपर्क ठेवण्याची वृत्ती यामुळेच त्यांना जनाधार मिळाला होता. मागील तीन वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माजी मंत्री चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याच्या मनसुब्यांना पूर्णतःपूर्णविराम मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्याच्या राजकारणात चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे सुनील चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण उभे राहिल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी खंबीरपणे चव्हाण यांनी शक्ती दिली होती. पण त्या निवडणुकीत राणा पाटील यांचा पराभव झाला.
आमदार पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, नव्हे तर त्याच चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली. चव्हाण यांचा पराभव करुन राणा पाटील आमदारही झाले. पण राणा पाटील यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली तर चव्हाण यांचा पक्ष राज्यात सत्तास्थानी आला. तालुक्यात काँग्रेस पक्ष सध्या कुठल्याही सत्तेवर नसला तरी काँग्रेसचा मतदार अजुनही चव्हाण यांच्यापासुन दुरावल्याचे दिसत नाही.
त्यामुळे पक्षाच्या बांधण्यासाठी सुनील चव्हाण यांना मोठी संधी आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील चव्हाण यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना सत्तेवर आणण्यात यश मिळवले. मागील सहा महिन्यात तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने त्यानी प्रयत्न केले व यशस्वी देखील झाले.
प्रदेश काँग्रेस सचिवपदी सुनील चव्हाण यांची निवड होणे हे पक्षासाठी उर्जितावस्था आणण्यासारखे आहे. सुनिल चव्हाण यांना आता तुळजापुर व नळदुर्ग नगरपालिकासह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यातही सुनिल चव्हाण यांचे सर्वपक्षीय नेत्याशी सलोख्याचे संबध असल्याने त्याचाही फायदा पुढील काळात होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तुळजापूर मतदारसंघात २०१४ पर्यंत अनेक विकासकामांचा धडाका असायचा, पण २१०४ ते २०१९ या कालावधीत युतीचे सरकार असताना विकासाचा कार्यक्रम ठप्प झाला असुन सध्याही विकास कामाची परिस्थिती तशीच आहे. लोकसभेला ज्या राणा पाटील यांना चव्हाण यांना मदत तर खासदार ओमराजे निंबाळकर यांना विरोध केला होता. आता यावेळी हेच चित्र उलटे झाले असुन खासदार ओमराजे हे सुनिल चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे अनेक ठिकाणी पाहयला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.