Nanded News: मराठवाड्यातील नांदेड व लातूर वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत काँग्रेसची परिस्थिती नाजूकच आहे. नांदेडचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सांभाळून होते. पण त्यांनी भाजपत उडी घेतली असल्यामुळे नांदेडला काँग्रेसची परिस्थिती दोलायमान झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अमित देशमुख सक्रिय होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नांदेडसाठी सध्या सक्षम नेतृत्वाची गरज असून, नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या आशेने लातूरकडे बघत आहेत. मराठवाड्यात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले. मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठवाड्यात काँग्रेसला बऱ्यापैकी चांगले दिवस होते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी कालपर्यंत नेतृत्व केले, पण आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठवाड्यात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली असून, अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी व या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित देशमुख यांना अशोक चव्हाण यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. लातूरला दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता. 18) झाले.
या सोहळ्यात काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अमित देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले व महाराष्ट्रात फिरून काँग्रेसला कठीण परिस्थितीतून काढण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. राज्यातले आम्ही सगळे नेते तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमित देशमुख यांच्याकडून बळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याने झालेले डॅमेज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशोक चव्हाण यांच्या समोर एक पर्यायी नेतृत्व म्हणून अमित देशमुख यांना बढती देण्याचे मत राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बनवले आहे.
आता स्वतः अमित देशमुख यांची यासाठी किती तयारी आहे, यावर पुढील गोष्टी अवलंबून असणार आहेत. काँग्रेससाठी नांदेड व लातूरचे राजकीय महत्त्व मोठे आहे. विलासराव देशमुख हे शंकरराव चव्हाण यांना आपले गुरू मानत होते, तर अशोक चव्हाण यांचे राजकीय गुरू शंकरराव चव्हाण होते. एकाच गुरूचे दोन शिष्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पक्षासाठी नांदेडला गुरू दक्षिणा देण्याची वेळ अमित देशमुख यांच्यावर आली आहे, म्हणून अमित देशमुख यांना नांदेडला सक्रिय होण्याची गरज आहे, अशी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.
मराठवाड्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी अमित देशमुखांना येणाऱ्या काळात जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना नांदेडकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नांदेडमध्ये काँग्रेससाठी सक्षम असा नेता राहिला नाही. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून आठ दिवस झाले आहेत. राज्यातील एकही मोठा नेता नांदेडला फिरकला नाही. ज्या चार पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यापैकी एकानेच उपस्थिती लावली.
पक्ष निरीक्षकांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पक्षाला उभारी देणारी भाषणं झाली नाहीत. नांदेडची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रदेशाध्यक्षासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी नांदेडला येणे गरजेचे आहे. एक आढावा बैठक घेऊन अमित देशमुखसारख्या सक्षम नेत्याला जबाबदारी दिली, तर पक्षाची पुढील पडझड थांबवून उभारी मिळू शकते, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.