Marathwada Politics : देशात अन् राज्यात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या काँग्रेस पक्षाची सध्या दुरावस्था झाली आहे. कायम सत्तेत राहिल्याने आंदोलनाची सवय मोडल्यामुळे आता विरोधात असलेल्या काँग्रेसला पदाधिकारी, कार्यकर्ते मिळेनासे झाले आहे. राज्यात महायुतीची सत्ता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतरचे सरकारविरोधातील पहिलेच आंदोलन फसले. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला दोन-तीनशे कार्यकर्ते, मोजक्या महिलांच्या सहभागाने काँग्रेसचे आंदोलन पुरते फसल्याचे चित्र होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खासदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सरकारविरोधी मोर्चात जिल्ह्यातील नेत्यांनी हजेरी लावली. पण मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या अत्यंत कमी होती. भर ऊन्हात मोर्चा निघाल्याने नेते घामाघूम झाले होते, तर सहभागी महिलांनी अर्ध्या वाटेतूनच निघून जाणे पसंत केले. मग जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचा सोपस्कार पार पाडत नेत्यांनी मोर्चाचा समारोप केला.
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर काँग्रेसने (Congress) अनेक वर्ष अधिराज्य गाजवले होते. देश पातळीवरील नेत्यांचा राबता कायम या शहरात असयायचा. पण गेल्या पंधरा वर्षापासून विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर कमालीची मरगळ आल्याचे दिसून आले. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने काँग्रेसला संजिवनी मिळाल्याचे चित्र होते. पण त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी देत पक्षात 'जान' आणण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या अध्यक्षांनी सगळ्यांना कामाला लावत सरकारविरोधात रान पेटवण्याचा कार्यक्रम आखून दिला. त्यापैकीच एक म्हणजे शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याचा मुहूर्त निवडत काँग्रेसने उत्सूकता वाढवली. एकाच वेळी संपूर्ण राज्यात एकाचवेळी आंदोलन करत काँग्रेस सरकारला धक्का देऊ पाहत आहे.
मात्र काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याने हा प्रयोग फसल्याचे दिसून आले. निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत संभाजीनगरात हा मोर्चा गुंडाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचला तेव्हा दीड दोनशे लोकच उपस्थितीत होते. प्रचंड ऊन असल्याने रस्त्याच्या कडेला खासदार कल्याण काळे यांनी छोटेखानी भाषण केले आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
या केल्या मागण्या
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष आहे. शेतकरी कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. तसेच पीक विम्याचा लाभ त्वरित मिळावा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तातडीने लागू करावी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि ठिबक सिंचनासह विविध कृषी अनुदान योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, विलास औताडे, प्रकाश मुगदीया, किरण डोणगांवकर आदी नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.