Nanded News : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांचे समर्थक राहिलले, पण आता पक्षासोबत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील काही आमदारांवर संशय व्यक्त केला जात आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी नांदेड जिल्ह्यातील काही आमदारांनी गद्दारी केल्याचे जाहीर सांगितल्याने, आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर यांच्याकडे संशयाची सुई जाते.
मात्र, आपल्या नावाची चर्चा होत असल्याचे कळताच मोहन हंबर्डे यांनी मात्र 'तो मी नव्हेच', अशी भूमिका घेतली आहे. "अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) काँग्रेसमध्ये असताना मी त्यांचा समर्थक होतो, आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे माझ्यावर संशय घेतला जात आहे. पण, मी सच्चा काँग्रेसी आहे, माझ्या रक्तात काँग्रेस आहे. मी 'क्रॉस व्होटिंग' केलेले नाही, तर पक्षाच्या आदेशानुसार मिलिंद नार्वेकर यांनाच मतदान केले," असे स्पष्टीकरण आमदार मोहन हंबर्डे यांनी दिले आहे.
नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर यांच्यासह मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार फुटल्याचा व त्यांची नावे आमच्या समोर असल्याचा दावा काँग्रेसच्या ( Congress ) राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. या सगळ्यांची नावे आणि अहवाल दिल्लीला पाठवण्यात आला असून या गद्दार आमदारांवर कठोर कारवाई येत्या 19 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्याला 11 तारखेलाच काही आमदारांवर संशय आला होता. "ते माझ्याच बाजूला बसत असल्याने त्यांचे मोबाईलवर हळूहळू बोलणे, मध्येच उठून जाणे या संशयास्पद हालचाली आणि उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले काही आमदार फुटणार असल्याची कल्पना आपण वरिष्ठ नेत्यांना दिली होती," असा दावा गोरंट्याल यांनी केला होता.
विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना नांदेड जिल्ह्यातील काही आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केल्याचे म्हटले होते. त्यानंतर हंबर्डे, अंतापूरकर यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. यावर मोहन हंबर्डे ( Mohanrao Hambarde ) यांनी स्पष्टीकरण देत आपण 'काॅस वोटिंग' केले नसल्याचे सांगितले.
मोहन हंबर्डे म्हणाले, "2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्याबद्दल अशाच अफवा पसरवल्या गेल्या होत्या. पण, तेव्हाही मी काँग्रेसचे ( Congress ) उमेदवार भाई जगताप यांनाच मत दिले होते. राज्यात सत्तातंतर झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मी गैरहजर होतो. पण, मतदानाची निश्चित वेळ सांगितली गेली नसल्यामुळे मला सभागृहात यायला फक्त तीस सेकंद उशीर झाल्यामुळे मतदान करता आले नाही. तेव्हा माझ्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना मी त्यांच्या समर्थक होतो. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यानंतर मी काँग्रेस सोबत राहिलो, पक्षाशी प्रामाणिक राहिलो."
"एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांना माझ्या विधानसभा मतदारसंघातून 18 हजार मतांची लीड दिली. त्यामुळे माझ्याबद्दल अफवा किंवा गैरसमज पसरवले जाऊ नयेत. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे," याचा पुनरुच्चार मोहन हंबर्डे यांनी करत आपली भूमिका स्पष्ट केली. हंबर्डे यांच्या खुलाशाने पक्षश्रेष्ठींचे समाधान होते का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.