Congress News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी 'क्रॉस वोटिंग' केली. त्याचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना बसला. यावरील वाद अद्याप संपलेला नाही.
याप्रकरणी काँग्रेसने चौकशी केली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी यासंदर्भात आपल्या चौकशीचा अहवाल श्रेष्ठींना पाठविला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी आपले मत व्यक्त केले.
"'क्रॉस वोटिंग' प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. याबाबत विनाकारण आपले नाव जोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ते सहन करणार नाही," असा इशारा शिरीष चौधरी यांनी दिला.
विधान परिषदेच्या ( Mlc Election ) निवडणुकीत काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी पक्षादेश झुगरला. त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये घेतल्या जाणाऱ्या नावांत आमदार शिरीष चौधरी यांचाही उल्लेख झाला होता.
याविषयी आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आमदार चौधरी म्हणाले, “ज्या कुठल्या सात आमदारांनी पक्षादेश न मानता सत्ताधारी पक्षाला मतदान केले असेल, त्यांना पक्षाने शोधावे. त्यांच्यावर कारवाई करावी. मात्र, ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांची नावे माध्यमांतून चर्चेत येऊ नयेत. अशी चर्चा होणे योग्य नाही. या चर्चेमुळे आपल्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत आपल्याशी संपर्क साधून खंत व्यक्त केली आहे.”
“या संदर्भात माझे नाव आल्याचे ऐकल्याने मला देखील आश्चर्य वाटले. मी आणि माझे कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले गेलेलो आहोत. आपण एकनिष्ठ आहोत. वेळप्रसंगी आपण राजकारण सोडून देऊ, पण कधीही गद्दारी करणार नाही,” या शब्दात आमदार चौधरी यांनी रावेर येथील आपल्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“आमचे सबंध कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझे आजोबा दिवंगत धनाजी नाना चौधरी यांनी ब्रिटिश सरकारच्या नोकरीला लाथ काँग्रेस आणि स्वातंत्र्य चळवळीत वाहून घेतले. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलो. त्यावेळी मला अनेक अमिषे दाखविण्यात आली. मात्र, अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता मी काँग्रेस सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचे कारण म्हणजे आमच्या कुटुंबाची नाळ काँग्रेसची जोडली गेली आहे. त्यामुळे ‘क्रॉस वोटिंग’ प्रकरणाशी आपले नाव जोडले गेल्याचा खेद वाटतो,” अशी खंत शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.