छत्रपती संभाजीनगर काँग्रेसमध्ये महिला अध्यक्षपदावरून मोठा वाद निर्माण झाला असून काही महिला नेत्यांनी डावलल्याचा आरोप केला आहे.
असंतुष्ट गटाने थेट दिल्लीतील काँग्रेस भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या वादामुळे स्थानिक काँग्रेस संघटनात तणाव वाढला असून वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता आहे.
संदीप लांडगे
Marathwada Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या तशा राजकीय पक्षांमध्ये विविध घडामोडी घडत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नसलेल्या काँग्रेस पक्षात सध्या पदासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. संघटना बांधणीत सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या महिलांनाच पद आणि जबाबदारी देणार असल्याचे अखिल भारतीय महिला काँग्रेस विभागाच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी आपल्या दौऱ्यात सांगीतले होते.प्रत्यक्षात मात्र जिल्हाध्यक्ष पदावर सदस्य नोंदणीत दुसऱ्या नंबरवर असलेल्या महिला पदाधिकाऱ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
यावरून आता जिल्हा काँग्रेसमधील (Congress) महिलांमध्ये भडका उडाला आहे. जिल्हाध्यक्ष पदावर दावा सांगणाऱ्या अनिता भंडारी यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. सर्वाधिक सदस्य नोंदणी आपण केलेली असताना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिसाळ यांना पद कसे दिले? असा संताप व्यक्त करत अनिता भंडारी यांनी थेट दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सर्वाधिक महिलांची नोंदणी करूनही अध्यक्षपदापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेध महिला पदाधिकारी अनिता भंडारी यांनी केला आहे. आपल्यावरील अन्याय दूर झाला नाही तर दिल्लीत (Delhi) इंदिरा भवन येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत त्यांनी महिला काँग्रेसच्या विद्यमान पदाधिकारी दिपाली मिसाळ यांच्यावर गंभीर आरोप केला. पक्षातील घोडेबाजार, पैशाची देवाणघेवाण आणि अन्याय झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा अलका लांबा आणि प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. यात ज्यांनी सर्वाधिक नोंदणी केली, त्यांना अध्यक्षपद देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. या मोहिमेत अनिता भंडारी यांनी 13 हजार 69 महिलांची नोंदणी केली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिपाली मिसाळ यांनी फक्त 1 हजार 188 महिलांची नोंदणी केली. तरीही आर्थिक देवाणघेवाण आणि राजकीय दबावामुळे भंडारी यांना अध्यक्षपद न देता मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
हा माझ्या निष्ठेचा आणि मेहनतीचा अपमान आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर विश्वास ठेवते. मी त्यांच्या न्यायालयात न्याय मागणार आहे. ज्या महिलेची अलका लांबा यांनी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, तिच्यावर एमपीआयडी कायद्यान्वये दहा गंभीर गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत. शिवाय तिचा भाऊ हा भाजपचा पदाधिकारी आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला काँग्रेसमध्ये स्थान कसे दिले? असा सवालही अनिता भंडारी यांनी केला.
काँग्रेस महिला आघाडीमधील या वादामुळे पक्षातंर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जर अखिल भारतीय महिला काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस यांनी न्याय दिला नाही. तर दिल्लीतील इंदिरा भवन येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. मी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या अन्यायाविरोधात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही अनिता भंडारी यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्या निर्देशानुसार त्यांनी सर्वाधिक नोंदणी केली असल्यामुळे अनिता भंडारी या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार होत्या. मात्र, त्यांना डावलण्यात आले. मी जिल्हा शहर अध्यक्ष असताना महिला अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेबाबत विचारणा केली नाही. दिपाली मिसाळ यांच्या निवडीमुळे भंडारी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत माझे वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी या वादावर म्हटले आहे.
मला दोषी ठरवणाऱ्या भंडारी कोण?
अनिता भंडारी यांच्यावर पक्षाने प्रदेश महासचिव पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. हा त्यांचा सन्मानच आहे. शिवाय माझी आणि त्यांची नियुक्ती ही दिल्लीतूनच झालेली आहे. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. माझ्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा भंडारी यांनी केलेला आरोप दुर्दैवी आहे. नऊ वर्षापुर्वीच्या प्रकरणात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. या सगळ्याची माहिती मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. त्यानंतर पक्षाने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि मी त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. आता या प्रकरणात मी दोषी आहे की नाही? हे न्यायालय ठरवेल तो अधिकार त्यांचा आहे. मला दोषी ठरवणाऱ्या अनिता भंडारी कोण? असा सवाल दिपाली मिसाळ यांनी केला आहे.
1. छत्रपती संभाजीनगर काँग्रेसमध्ये नेमका वाद कशावरून निर्माण झाला?
→ महिला अध्यक्षपदाच्या नियुक्तीवर काही कार्यकर्त्यांनी डावलल्याचा आरोप केला आहे.
2. कोणत्या महिला नेत्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे?
→ असंतुष्ट गटातील काही स्थानिक महिला नेत्यांनी दिल्लीतील काँग्रेस भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
3. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या वादावर प्रतिक्रिया दिली का?
→ अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी दिल्लीतील नेतृत्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
4. या वादाचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
→ स्थानिक संघटनेत फूट पडण्याची आणि निवडणूक तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
5. पुढील पाऊल काय असू शकतं?
→ मध्यस्थी करून असंतुष्ट गटाला थोपवण्याचा आणि तातडीने बैठकीद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.