अनिल कदम
देगलूर : देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक तशी अकालीच. विद्यमान दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पुनर्रचनेनंतर २००९ साली अस्तित्वात आलेला देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणून राखीव झाला तेव्हापासूनची ही पाचवी निवडणूक आहे.
आजपर्यंत झालेल्या चार निवडणुकात ४४ जणांनी विधानसभेवर जाण्यासाठी आपले नशीब अजमावून पाहिले, पण आलटून पालटून दोन घराण्यातील व्यक्तींनाच विधानसभेवर जाण्याची संधी मतदारांनी दिली. या अकाली पोटनिवडणुकीसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .त्यातील पारंपारिक दोन प्रस्थापित ही या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असल्याने पुन्हा या दोन घराण्यातच अटीतटीची लढाई होईल की इतर कोण बाजी मारेल हे ३० ऑक्टोंबरनंतरच कळेल.
२००९ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते .तालुक्याचे भूमिपुत्र व जि.प.चे माजी अध्यक्ष दिवंगत संभाजीराव मंडगीकर यांनीही नशीब अजमावून पाहिले. पण त्यांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. अपक्ष म्हणून उभे असलेल्या व सध्या भाजपात असलेले मारोतराव वाडेकर यांनी मात्र १६४०० मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
खरे तर या निवडणुकीत अटीतटीची स्पर्धा झालेले दोघेही तेव्हा देगलूरनिवासी नसताना मतदारांनी काँग्रेसच्या मुंबईस्थित निवासी उमेदवाराच्या पारड्यात वजन टाकून नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली होती. २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात होते. तेव्हाही चौरंगी सामना होतो की काय अशी परिस्थिती झाली असताना शेवटी लढाई काँग्रेस-शिवसेनेमध्ये होऊन मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात वजन टाकले.
मात्र स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपाच्या व सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या भीमराव क्षिरसागर यांनी कमळावर २०५४२ मते मिळवली. तर यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले मारोतीराव वाडेकर यांनीही १२१२६ मते मिळवुन चौथे स्थान पटकावले. २०१९ च्या तिसर्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त नऊ ऊमेदवार रिंगणात होते .यावेळी काँग्रेस-शिवसेनेमध्ये फाईट होऊन मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकले. यावेळी वंचितचे रामचंद्र भरांडे यांनी १२०५७ मते घेतल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
पती-पत्नीची अशी ही लढाई ...
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार संघातले रहिवाशी असलेले दगडापूर ता. बिलोली येथील वाघमारे बाबुराव लक्ष्मण यांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावून पाहिले. त्यावेळी त्यांना फक्त ५६५ मते मिळाली . २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पत्नी विमलबाई बाबुराव वाघमारे यांना उभे केले. त्यांनाही त्यावेळी फक्त ६५८ मते मिळाली. पुन्हा विमलबाई वाघमारे दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पती-पत्नीची ही तिसरी निवडणूक आहे.
सुरुवातीपासून पक्ष कोणता का असेना पण अंतापूरकर व साबने या दोन घराण्यातच या राखीव मतदार संघाच्या नेतृत्वाची वाटणी झालेली दिसून येते. आज पर्यंत ४४ व या निवडणुकीतील १२ अशा ५५ जणांनी विधानसभेत जाण्याचा प्रयत्न केला आहे, यावेळेस या दोन घराण्यातुनच नेतृत्वाची संधी मिळते की दुसरा कोण या मतदारसंघाचा वारस होतो हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.