Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये गुरूवारी जाहीर सभा झाली. या सभेत पवारांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. या सभेचा धुराळा खाली उडत नाही तोच आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सभेला प्रत्युत्तर द्यायला तयार झाले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आठ मंत्रीही २७ ऑगस्टच्या सभेला येणार आहेत.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर ही सभा होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मैदानाची पाहणी करुन सभेसाठीच्या विविध परवानग्या घ्यायलाही सुरुवात केली. राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याचे जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पवारांच्या सभा झालेल्या ठिकाणी सात दिवसांनी आपणही प्रत्युत्तर सभा घेण्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, शरद पवारांनी नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात (जि. नाशिक) येथे सभा घेतल्यानंतर याठिकाणी भुजबळ यांनी सभा घेऊन पवारांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दीड महिने पवारांचा थांबलेला दौरा बीडच्या स्वाभिमान सभेने सुरु झाला आहे. गुरुवारी बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, आमदार अनिल देशमुख, आमदार अनिल भुसारा आदी मंडळींनी हजेरी लावली.
यात शरद पवार यांनी केंद्र सरकारचे धोरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. तर, नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. आता याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय अजित पवार(Ajit Pawar)यांनी घेतला आहे. ही सभा २७ ऑगस्टला छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषीमंत्री धनंजय मुंडे, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री अनिल पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अदिती तटकरे यांची देखील उपस्थिती असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, सभेच्या मैदानाची पाहणी करुन विविध तांत्रिक परवानग्या काढण्याची प्रक्रियाही सुरु झाल्याचे बीड विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते बळीराम गवते यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत वाल्मिक कराड, बबन गवते, नंदु कुटे, महादेव उबाळे, बाळासाहेब गुजर, अप्पा इंदोरे, केशव तांदळे आदी उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.