हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
आमदार अनुराधा चव्हाण यांना राजकीय बळकटी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
या हालचालीमुळे फुलंब्रीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
नवनाथ इधाटे
Phulambri Assembly Constituency : आधी विधानसभेचे अध्यक्ष पद आणि आता थेट राजस्थानचे राज्यपाल झालेल्या हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची सध्या जोराच चर्चा सुरू आहे. बागडे नाना यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात काहीच कमी पडायला नको, याची काळजी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. विद्यमान आमदार अनुराधा चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये मतदारसंघात राज्य पातळीवरचा कार्यक्रम यशस्वीरित्या घेत हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारसा आपण त्याच मार्गाने पुढे नेत आहोत, असा विश्वास यातून दिल्याचे बोलले जाते.
हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हे भाजपातील वरिष्ठ नेते आहेत. जनसंघापासून पक्षात कार्यरत असलेल्या 'नाना' यांच्यावर पक्षाने वेळोवेळी महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. महाराष्ट्र विधीमंडळाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून बागडे यांनी आपली छाप पाडल्यानंतर पक्षाने त्यांना आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपवली. निवडणुकी आधीच बागडे यांनी आपण आता विधानसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बागडे यांच्यानंतर कोण? असा प्रश्न जेव्हा विचारला गेला, त्यावर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती राहिलेल्या अनुराधा चव्हाण यांचे नाव समोर आले.
आदर्श किनगांव, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांनी केलेले उल्लेखनीय काम पाहता विधानसभेसाठी त्यांची दावेदारी महत्वाची समजली गेली. शिवाय हरिभाऊ बागडे यांचाही आशिर्वाद त्यांच्या पाठीशी होता. परंतु संघटनात्मक रचना आणि उमेदवार निवडीची परीक्षा अनुराधा चव्हाण यांना द्यावीच लागली आणि ती त्यांनी उतीर्णही केली. प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 20-25 वर्ष मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांनी केलेली विकासकामे आणि त्यामुळे मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा याच ओझं घेऊन अनुराधा चव्हाण मैदानात उतरल्या.
मतदारांनी महिला प्रतिनिधी म्हणून त्यांना विधानसभेवर निवडून पाठवलं आणि वर्षभरात मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात एका महत्वाकांक्षी योजनेच्या शुभारंभासाठी आले. पक्षाच्या नेतृत्वाने नवख्या महिला आमदारांवर दाखवलेला हा विश्वास असल्याचे यानिमित्ताने बोलले जाते. महिला सबलीकरण, शैक्षणिक सुविधा, पायाभूत सोयीसुविधा अशा अनेक क्षेत्राला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्ष वेधून घेणार ठरला आहे.
हरिभाऊ बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलंब्री मतदारसंघाला काहीही कमी पडता कामा नये, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असल्याचेही या निमित्ताने दिसून आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ फुलंब्री मतदारसंघातून करत फडणवीस यांनी आपल्या कृतीतूनही ते दाखवून दिले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी फुलंब्री मतदार संघात ठाण मांडून होते.
खऱ्या अर्थाने फुलंब्री मतदारसंघाचे पालकत्वच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारल्याची चर्चा सुरू त्यांच्या दौऱ्यानंतर होत आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांना पूर्णपणे राजकीय बळ आणि मतदारसंघातील विकास कामासाठी निधी कुठेही कमी पडणार नाही, याची ग्वाहीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
प्र.1: हरिभाऊ बागडे कोणत्या पदावर नियुक्त झाले?
उ.1: त्यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
प्र.2: बागडे राज्यपाल झाल्यानंतर फडणवीस कुठे लक्ष केंद्रीत करत आहेत?
उ.2: फुलंब्री मतदारसंघावर त्यांचे विशेष लक्ष आहे.
प्र.3: अनुराधा चव्हाण यांना कोणाचा पाठिंबा मिळतो आहे?
उ.3: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पाठिंबा मिळतो आहे.
प्र.4: या बदलामुळे कोणता परिणाम होऊ शकतो?
उ.4: फुलंब्रीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
प्र.5: या हालचालीवर विरोधक काय म्हणत आहेत?
उ.5: विरोधकांनी भाजपवर राजकीय हित साधण्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.