अनिल जमधडे
Phulambri Constituency : कौशल्य विकास, कुशल मनुष्यबळ निर्मिती या अनुषंगाने शेंद्रा औद्योगिक वसाहत, भविष्यातील उद्योग उभारणीतून मोठ्या प्रमाणात मतदासंघातील तरुणांच्या हाताला रोजगार याशिवाय औद्योगिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उभारण्यावर आपला भर आहे. यात प्रामुख्याने प्रदीर्घ काळापासून बंद असलेला आणि फुलंब्री विधानसभा मतदासंघाच्या अर्थकरणाचा घटक असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याकडे पाऊल टाकले आहे. त्यात भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य राहणार असल्याचे भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.
'सकाळ माध्यम समूहा'तर्फे 'माझा मतदारसंघ, माझी भूमिका'या विषयावर आयोजित उपक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली. फुलंब्री विधानसभा मतदासंघाची रचना ग्रामीण, शहरी व निमशहरी असल्याने येथे गरजांमध्येही भिन्नता आहे. त्यामुळे भविष्यातील विकासात्मक नियोजनाच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि आरोग्याच्या हिताच्या योजना या दोन्ही विषयांना धरून शैक्षणिक सुधारणा करण्यावर माझा भर आहे. मतदारसंघात विषमुक्त शेती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समृद्धीसाठी आपण बांधील आहोत. त्या दृष्टीनेच विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार असल्याचे अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) म्हणाल्या.
माझ्या मतदासंघातील काही गावे शहरात असल्याने शहरी आणि ग्रामीण अशा मिश्र मतदारांच्या विभिन्न मागण्यांकडे मला लक्ष केंद्रित करावे लागते. (BJP) शहराला लागून असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला, दुग्ध व्यवसाय व शेतीशी निगडीत जोडव्यवसाय करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी सहाशे ते सातशे कि.मी. शेतरस्त्याची आवश्यकता आहे. या रस्त्यांच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यावर आपला भर आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांवरही काम करणे आवश्यक असून वीज पंपांसाठी विद्युत रोहित्राची (डी.पी) तत्काळ उपलब्धता होईल, यासाठी प्रयत्न आहेत. फुलंब्री मतदारसंघ शहराला लागून असल्याने पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यावर भर देत आहेत. हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आपण सरकारी आणि खासगी अशी शिक्षणाची दरी दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. शिक्षण व्यवस्थेनंतर आरोग्याच्या अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रबळ होणे गरजेचे आहे.
सकस आहाराच्या अनुषंगाने विषमुक्त शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता पिकलेल्या फळभाज्या, धान्योत्पादन व त्याची शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य पातळीवर पाठपुरावा करणार आहे. शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना पाठबळ देण्याचे व शेतकरी बांधवांना शेती माल पिकवण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात व तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक कष्टही कमी करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण करण्यावर आपला भर आहे. बाजार समितीच्या माध्यमातून, कांदा लिलावही सुरू करण्यात आला आहे. सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या सहकार्याने डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कार्य करणार आहे. बचत गटाचे ‘कॉमन फॅसिलिटेशन सेंटर’ची उभारणी करण्याचा मानस असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
देवगिरी कारखाना सुरू करणार
प्रदीर्घ काळापासून बंद असलेला आणि फुलंब्री विधानसभा मतदासंघाच्या अर्थकरणाचा घटक असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याकडे पाऊल टाकले आहे. त्यात भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य राहणार आहे. याशिवाय हा कारखाना सुरू होत असल्याने पंचक्रोशीतील जमिनेचे दर दुप्पट होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अंगणवाडी, पाळणाघर योजनेची अंमलबजावणी व्हावी, त्यातून महिला, भगिनींचा संसार फुलावा, अर्थाजन निर्माण होणाऱ्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी संगोपन व्यवस्थापनावर आपण विशेष भर देत आहोत.
विकास आराखडा तयार
नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आरखडा मंजूर करण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आता हा विकास आराखडा तयार झाला आहे. याशिवाय कुठल्याही प्रकारे नागरिकांचा घर किंवा प्लॉट खरेदीत फसवणूक होऊ नये यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात फुलंब्री येथील बोगस अकृषक लेआऊटचा मुद्दा उपस्थित करून 159 कुटुंबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
किनगावप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक गाव आदर्श गाव करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शहरी भागातील कष्टकरी नागरिकांच्या वस्त्यांचा विकास करणे, रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करणे यावर आपण भर देणार आहोत. शहर विकास प्राधिकरणाचा विकास अत्यंत योग्य व भविष्यातील गरजा पूर्ण करणारा असेल व कोणाचाही कष्टाने उभारलेला निवारा ‘अतिक्रमण’ या शब्दाच्या व्याख्येत बसणारा नसेल, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमावर माझ्या विधानसभा मतदारसंघात भर दिला जात आहे. पुढील पाच वर्षांत आजच्या पेक्षा किमान एक टक्का वनाच्छादन वाढविण्यावर भर असून, पर्यावरणपूरक व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ऊस आणि मका या पिकांच्या काही घटकांपासून इथेनॉलसारखे पदार्थ निर्माण व्हावेत आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी प्रकल्प उभारणीचा प्रयोग भविष्यात राबविला जाणार आहे. याशिवाय ग्रीन हायड्रोजन, औषध निर्मितीसारख्या उद्योगांवरही भर दिला जाणार आहे. केंद्रबिंदू प्रामुख्याने शेतकरी व युवक असणार आहे.
विमानतळ विस्तारीकरणात सर्वंकष न्याय
छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणात अनेकांची घरे आणि मालमत्ता बाधित होत आहेत. या प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही, यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठका झाल्या आहेत. विविध नागरी व भूसंपादनाचा मोबदला या अनुषंगाने सर्वंकष न्याय देण्याचा प्रयत्न आहे.
शहर आणि फुलंब्री मतदारसंघातील अनेक गावांसाठी प्राधिकरण असलेल्या सिडकोकडील अधिकार काढून ते शहर विकास प्राधिकरणाकडे देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे. अतिरिक्त शेंद्रा (सटाना) मध्ये लवकरच भूसंपादन होईल. शेतकरी बांधवांना पैसे मिळतील व औद्योगिक विकासासाठी जागा उपलब्ध होऊन मोठे उद्योग येतील, असा आशावादही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.