Parbhani News : मुख्यमंत्री पदाच्या अहमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडले. त्यामुळे देवेंद्र पर्व हे राजकीय नीतिमूल्यांच्या ऱ्हासाचे पर्व म्हणून ओळखले जाईल, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेनेच्या मुक्त संवाद अभियानांतर्गत मानवत येथे त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात वंचितला कोणाच्या जागा द्यायच्या, याचा निर्णय झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असेही अंधारे यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. यातून स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही कशी वाढत चालली आहे, हे दिसून येते. निवडणूक आयोगाने निर्णय दिला म्हणून पक्ष जात नसतो.
शिवसेनेमध्ये मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरे नाव वगळून दुसरे अधिष्ठान असू शकत नाही, तीच स्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात नीति आणि अनीति खेळ संपवून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेली आहे. त्यामुळे देवेंद्र पर्व हे राजकीय नीतिमूल्यांच्या ऱ्हासाचे पर्व म्हणून ओळखले जाईल, असेही अंधारे म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असे वाटते की, आपला नेता सर्वोच्च स्थानी असावा, त्यामुळे राज्याच्या पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असेच आम्ही म्हणणार. कदाचित भविष्यात कॉंग्रेसचा नेताही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. दीपक केसरकर यांच्यासारखा लबाड कोल्हा मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. केसरकर अगोदर सांगतात, की राष्ट्रवादी कॉंग्रेसने हिंदुत्व सोडले म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही.
मात्र, राष्ट्रवादीचे अजितदादा सरकारमध्ये सामील होतात तेव्हा तेच केसरकर अजित पवार यांच्या गाडीमागे धावतात. मुळात केसरकर यांच्यासारख्या लोकांना निष्ठेने कुठे नांदायचेच नसते म्हणून ते कारणे सांगतात, अशा शब्दांत अंधारे यांनी केसरकरांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे जागावाटप लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आणखी दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
विशेषतः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणत्या पक्षाच्या कोट्यामधून जागा द्यायची याचा निर्णय झाल्यानंतर जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय जाहीर करतील, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ते असे करतील, असे वाटत नाही.
मात्र, त्यांनी भाजपला मदत करण्याचे ठरवले असेल तर सांगता येत नाही. राज्यातील मीरा - भाईंदर, पुसेसावळी अशा ठिकाणी हिंदू - मुस्लिम वाद पेटवण्यासाठी भाजपच्या बोलघेवड्या लोकांनी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये केली. मात्र, मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने हिंदू - मुस्लिम दंगल झाली नाही. त्यामुळे भाजपने एक नवा डाव खेळला आणि मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवला.
आतापर्यंत गावगाड्यात गुण्यागोविंदाने नांदणारे बाराबलुतेदार आणि मराठा बांधव आता परस्परांकडे संशयाने बघत आहेत. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुरघोडीचे राजकारण जबाबदार आहे, असा आरोपही अंधारे यांनी केला. महिला सुरक्षितता, शेतीमालाला भाव, पीकविमा या प्रश्नाला उत्तर नसल्याने मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.