Beed Political News : शुक्रवारी परळीत शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी अपहरण करून बेदम मारहाण केली होती. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकीही आरोपींनी दिली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. आज दिवसभरात शिवराज दिवटे यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांची अंबाजागोईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात गर्दी होती. मारहाण करणाऱ्या आरोपींचा वाल्मीक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध जोडला जात आहे.
या घटनेला जातीय वळण लागले असून जिल्ह्यात पुन्हा मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी थेट अंबाजोगाई गाठत शिवराज दिवटे उपचार घेत असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी करतानाच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द दिला.
धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडिया हॅन्डलवरून या भेटीची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज दिवटे याची आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. (Beed News) लिंबोटा गावचे शिवराज, संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत.
शिवराजला मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जावी. बीड पोलीस अधीक्षक श्री. नवनीत यांच्या नेतृत्वात पोलीस योग्य तपास करतील व आरोपींना कडक शासन केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या घटनेत कुठेही जाती धर्माचा संबंध नाही, या पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. शिवराजला न्याय मिळणे व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे यासाठी आगामी काळात कठोर पावले उचलली जावीत, याबाबत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
उद्या (ता.19) रोजी पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि परळी, अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्गघाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्माण झालेला रोष कमी करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेऊन केल्याचे बोलेले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.