बीड ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयाने महाविकास आघाडीतील नेते सध्या भलतेच खूष आहेत. राज्यातच नाही तर देशभरातील इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये देखील भाजपची पिछेहाट झाली आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचारात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या विजयाने त्यांना देखील आनंद झाला.
महाविकास आघाडी सरकार कुठलेही आक्रमण परतवून लावण्यास समर्थ असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. मी विरोधकांना सांगत होतो, कुणाचाही नाद करा, पण शरद पवारांचा करू नका, ते होत्याच नव्हंत आणि नव्हत्यांच होतं करतात, असा हल्ला मुंडे यांनी भाजपवर आपल्या प्रचारसभांमधून चढवला होता.
या निवडणुकीत काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर ४२ हजार मताधिक्य घेऊन निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणाले, या विजयाने महाविकास आघाडी आणखी मजबूत झाली आहे.
आम्ही कोणत्याही आक्रमणाला परतवून लावायला सक्षम आहोत हे सिद्ध करणारा निकाल देगलूर-बिलोली मतदारसंघातील जनतेने दिला आहे. महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास आहे, यावर या निकालातून शिक्कामोर्तब झाले आहे.
जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असा विश्वास मला होता. आजचा निकाल हा त्या विश्वासाला सार्थ ठरवणारा असल्याचेही मुंडें यांनी म्हटले आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या एकाच दिवसात चार झंझावाती प्रचारसभा झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.