Marathwada News: राज्यातील सत्तातंरानंतर झालेल्या बाजार समितीच्या (Dharashiv Market Committee) निवडणुकीत जिल्ह्यातील कौल बघितला तर तो सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्याला मंत्रीपद, सत्तेची सुत्र हाती असतांना महाविकास आघाडीने मिळवलेले यश नक्कीच उजवे ठरले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसाठी ही धोक्याची घंटा येणाऱ्या काळात ठरू शकते. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आठ पैकी पाच ठिकाणी बाजी मारत महायुतीला झटका दिला आहे.
त्यातही शिंदे सेनेच्या दोन आमदारांच्या मतदारसंघात पाच पैकी एकाच ठिकाणी यश आल्याचे दिसुन आले. (Marathwada) मोजके मतदार असलेल्या या निवडणुकीत महायुतीची दाणादाण उडाल्याने भविष्यात होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत काय होणार याचा अंदाज या निकालातून काढला जात आहे. भाजपाचा विचार केला तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा प्रभाव असलेल्या तीन तालुक्यापैकी एका ठिकाणी त्यांना अपयश आले.
कळंब बाजार समितीवर आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता खेचुन आणल्याने ठाकरे सेनेचा प्रभाव दिसून आला. राणा पाटील यांच्याकडे धाराशिव,तुळजापूर व कळंब येथे सत्ता होती, पण आता कळंबची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. (Tanaji Sawant) दोन तालुक्यात मात्र राणा पाटील यांचा करिष्मा कायम राहिला. शिंदे सेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) व माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या प्रभाव क्षेत्रातील उमरगा व मुरुम बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याने दोघांना जबर धक्का बसला.
याठिकाणी माजी आमदार बसवराज पाटील यांच नेतृत्व सर्वमान्य ठरल्याचे दिसते. शिंदे सेनेला मतदारानी झिडकारल्याने त्यांना पुढील काळात अधिक काम करावे लागणार आहे. भुम, परंडा व वाशी येथेही राहुल मोटे व ज्ञानेश्वर पाटील या दोन माजी आमदाराचा प्रभाव दिसुन आला आहे. तिथे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना चांगलाच धक्का बसला. भुम येथील बाजार समितीवर प्रा. सावंतानी एकतर्फा विजय मिळाल्याने काही प्रमाणात सावंताची लाज राखली गेली. पण हा निकाल सत्ताधारी तीनही आमदारांना डोळ्यात अंजन घालणाराच आहे.
त्यातही राणा पाटील यांची कामगिरी शिंदे सेनेच्या आमदारापेक्षा नक्कीच चांगली आहे. ठाकरे सेनेचे निष्टावंत आमदारांना कळंब या त्यांच्या मतदारसंघातील समिती ताब्यात आल्याने त्यांचीही मतदारसंघातील छाप दिसुन आली. धाराशिवमध्ये त्यांच्या मतदारसंघातही चांगला प्रभाव जाणवला. मात्र तुळजापूर मतदारसंघात असलेल्या ७२ गावात अजुन काम करण्याची गरज असल्याचे निकालावरून स्पष्ट झाल आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कैलास पाटील यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या लोकसभा मतदार संघाचा विचार करता त्यांना चांगल यश मिळाल्याचा दावा ते करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.