Dharashiv Loksabha News : महाविकास आघाडीमुळे धाराशीवमध्ये ओमराजेंचे पारडे जड..

Shivsena : शिंदे गटाचे नेते व जिल्ह्यातील मंत्री तानाजी सावंत यांची देखील भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.
Dharashiv Loksabha Constituency News
Dharashiv Loksabha Constituency NewsSarkarnama

Mahavikas Aghadi : राज्यातील सत्तातंरानंतर घडलेले नाट्य, ठाकरे यांच्याकडून हिरावला गेलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यामुळे जनतेच्या मनात संतापाचे वातावरण आहे. हिंदुत्व वाचवण्यासाठी, बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला, असा कितीही दावा मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले ४० आमदार करत असले तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने ते बंडच होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यातील जनतेचा मुड स्पष्टपणे दिसून आला.

Dharashiv Loksabha Constituency News
Harshvardhan Jadhav News : मोदींच्या विकासाचे माॅडेल मार्केटिंगचे, तर केसीआरांचे प्रत्यक्षातले..

शिंदे गटाने केलेले बंड, त्याला भाजपने दिलेली साथ आणि त्यातून झालेला सत्ताबदल जनतेने स्वीकारलेला नाही हेच यातून स्पष्ट झाले. (Omraje Nimabalkar) त्यामुळे हेवेदावे, कुरबुरी सोडून महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकदिलाने काम करतांना दिसत आहेत. याचे चांगले परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिसू शकतात. (Ranajagjeetsingh patil) धाराशीव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सुरुवातीपासूनच इथे शिवसेनेचे प्राबल्य राहिलेले आहे. १९९६ ते २०१९ या तेवीस वर्षात दोन अपवाद वगळले तर या मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेने युतीमध्ये विजय मिळवलेला आहे.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सव्वा लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. जिल्ह्यातील त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि तेव्हा राष्ट्रवादीमध्ये असलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी त्यांचा सामना झाला होता. तेव्हा युतीमुळे ओमराजे विजयी झाले होते, असा दावा भाजपकडून केला जातोय. आता हे दोन्ही पक्ष स्वतंत्र झाले, शिवाय शिवसेनेत देखील मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होणार असला तरी महाविकास आघाडीमुळे ओमराजे यांचेच पारडे जड राहील अशी सद्यपरिस्थिती आहे.

केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे भाजपची ताकद मतदारसंघात वाढल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती ओमराजे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत. आधी आमदार आणि आता साडेतीन वर्षापासून खासदार म्हणून ओमराजे यांचे काम, शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते घेत असलेले परिश्रम यामुळे ते बरेच लोकप्रिय आहेत. ही देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. भाजपकडे राणाजगजीतसिंह पाटील हा एकमेव हुकमी एक्का मतदारसंघात असला तरी त्यांना पक्षांतर्गत आणि शिंदे गटातील नेत्यांकडूनच धोका होण्याची अधिक शक्यता आहे.

शिवसेनेत फुट पडल्याने तीनपैकी दोन आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत. त्याचा काही प्रमाणात फटका बसणार असला तरी शिवसेनेचा एकनिष्ठ मतदार आणि सामान्य शिवसैनिक ठाकरे गटासोबत कायम असल्याचे चित्र आहे. १९७७ ते २००९ पर्यंत धाराशिव लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव होता. यामध्ये काँग्रेसने १९९६ पर्यंत मतदारसंघावर पकड निर्माण केली होती. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा उमेदवार येथे विजयी झाला. आतापर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये एकदा काँग्रेस व २००९ मध्ये राष्ट्रवादीने इथे विजय मिळवला होता.

Dharashiv Loksabha Constituency News
Ambadas Danve News : मंत्रीपद मिळत नसल्याने शिरसाट वैफल्यग्रस्त, मी कधीही त्यांना फोन केला नाही..

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रविंद्र गायकवाड यांनी विद्यमान खासदार पद्मसिंह पाटील यांचा तब्बल २ लाख ३५ हजार मतांनी पराभव केला होता. परंतु दरम्यानच्या काळात त्यांच्या कामाबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी होती, त्याचा फटका बसू नये म्हणून शिवसेनेने विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली आणि ओमराजे सारख्या नव्या चेहऱ्याला संधी दिली. मतदारांनी हा पर्याय स्वीकारला आणि त्यांना निवडून देत दिल्लीत पाठवले. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या राणापाटील यांचा त्यांनी पराभव केला. आता भाजपकडून २०२४ मध्ये पुन्हा एकदा राणापाटील आणि ठाकरे गटाचे ओमराजे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

राणा पाटील यांनी लोकसभेत पराभव होताच राष्ट्रवादी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तुळजापुर विधानसभा मतदारसंघातून ते सध्या भाजपचे आमदार आहेत. गेल्या वेळच्या निवडणुकीचा विचार केला तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे सहा मतदारसंघापैकी पाच आमदार होते. एकमेव ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे आमदार असले तरी रविंद्र गायकवाड यांना डावलल्यामुळे ते देखील प्रचारात सक्रीय नव्हते. म्हणजे एकाही आमदाराची शक्ती नसतानाही ओमराजे यांनी लोकसभेला विजय मिळवला होता.

मोदी लाट, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची मदत व भाजपचे मतदान त्याला निश्चितपणे कारणीभुत ठरले हे देखील विसरुन चालणार नाही. पण फक्त मोदी लाट एवढ्या एका गोष्टीमुळे त्यांचा विजय झाला असे म्हणणे या मतदारसंघात धाडसाचे ठरते. आताही आमदार कैलास पाटील वगळता एकही आमदार महाविकास आघाडीचा नाही, पण तरीही ओमराजे यांचे पारडे आजच्या स्थितीला जड आहे. ओमराजे यांच्याविरोधात उमेदवार देतांना भाजपला अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

गेल्यावेळी प्रमाणे पारंपारीक राजकीय शत्रु असलेल्या राणा पाटील व ओमराजे यांच्यात सामना झाल्यास निश्चितपणे ही लढत चुरशीची ठरेल यात शंका नाही. मात्र राणा पाटील यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार ओमराजे यांच्यासमोर टिकाव धरु शकणार नाही, अशी स्थिती आहे. भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नाव चर्चेत आहे. या शिवाय जिल्ह्यातील एखादा तगडा नेता पक्षात आयात करुन भाजप वेगळी चाल खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या स्थितीला तरी राणा पाटील विरुध्द ओमराजे असाच सामना होईल अशी शक्यता आहे.

Dharashiv Loksabha Constituency News
K.Chandrasekhar Rao News : शेतकऱ्यांना दहा हजार, मोफत वीज द्या, मी महाराष्ट्रात येणार नाही..

तसे झाले तरीही ओमराजे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा राणा पाटील यांच्यासाठी आव्हानात्मकच राहणार आहे. राणा पाटील यांचे प्रस्थ मोठे असले तरी लोकसभा मतदारसंघात व्यक्तीगत संपर्क नसल्याने त्यांची अडचण होवू शकते. शिंदे गटाचे नेते व जिल्ह्यातील मंत्री तानाजी सावंत यांची देखील भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, त्यामुळे धाराशीवच्या जागेवर शिंदे गटाकडून देखील दावा केला जावू शकतो. अशावेळी सावंत देखील लोकसभेचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. एकंदरित शिंदे गट-भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील हा सामना लक्षवेधी ठरणार एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com