युवराज धोतरे
latur News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी विविध नावाची चर्चा सध्या सुरु आहे. विशेषतः लातूर लोकसभेसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा ऐकवायस मिळत आहे.
शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख एका खासगी कार्यक्रमानिमित्त उदगीरात आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या लोकसभा उमेदवाराबाबत त्यांनी मौन धारण करीत हा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतुन क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode ) हे भाजपाचे उमेदवार आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे की घड्याळ चिन्हावर लढायचे हे क्रीडामंत्री सांज बनसोडेंनी ठरवावे, असे म्हणत उमेदवारीचा चेंडू मंत्री संजय बनसोडेच्या कोर्टात पाठवला आहे.
भाजपच्या (Bjp ) संसदीय बोर्डाने सत्तर वर्षावरील विद्यमान खासदाराना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये लातूरचा नंबर आहे की नाही असा प्रश्न पत्रकारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांना विचारला असता त्यांनी याचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे चर्चेला पुन्हा उधान आले असून संसदीय बोर्डाच्या त्या यादीत लातूरचा समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
येत्या काळात विद्यमान खासदारांना डच्चू मिळणार असेल तर नवे खासदार कोण? असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा जिल्हाध्यक्षांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय भाजपच्या संसदीय बोर्डाचा असल्याचे सांगितले. यावरून लातूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत निश्चितपणे खलबत सुरू आहेत. लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात समाधानकारक काम केले नाही, मतदारसंघात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचा लोकसभेचा उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला असेल तर यावेळी तरी उदगीरला खासदार पदाची संधी मिळणार का ? असा प्रश्न आहे. उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, नारायण मिरगे असे अनेक उदगीरचे दिग्गज भाजपचे निष्ठावंत लातूरची लोकसभा लढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून इच्छुक आहेत. यांच्या रूपाने उदगीरकरांना खासदार पदाची संधी मिळते की नाही ? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
(Edited by Sachin Waghmare)