Lok Sabha Election 2024 : राजकीय नेत्यांचा दिनक्रम प्रचंड धावपळीचा असतो. निवडणुकीच्या काळात तर त्यांच्या पायाला भिंगरी लागलेली असते. पहाटे लवकर सुरू झालेला दिवस रात्री उशीरा संपतो. अशा या धावपळीत त्यांना वैयक्तिक अडचणींना, कुटुंबीयांच्या आजारपणालाही तोंड द्यावे लागते. हे सर्व सुरू असताना शेतकरी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही त्यांना पुढाकार घ्यावा लागतो.
भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (MLA Ranjagjitsinh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार होत्या. हा मतदारसंघत धाराशिवसह लातूर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांत विस्तारलेला आहे.
7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात मतदान झाले. त्यामुळे आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची धावपळ थांबली. धावपळ थांबली असे वाटत असतानाच आमदार पाटील यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinh Patil) आजारी पडले.
त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आजार किरकोळ असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी पोस्ट आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाज माध्यमावर टाकली आहे.
धाराशिव जिल्ह्यात 23 रोजी काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळपिकांचेही नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आमदार पाटील सोलापूर येथील (Solapur hospital) रुग्णालयातून 24 मे रोजी सकाळी ईर्ला, भंडारवाडी, दाऊतपूर (ता. धाराशिव) या गावांत पोहोचले. या गावांतील घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील पत्रे उडाल्यामुळे लोकांचा संसार उघड्यावर आला आहे.
आमदार पाटील यांनी या नागरिकांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. एका घरावरील पत्रे उडाल्यामुळे शेतकऱ्याची 40 पोते ज्वारी भिजल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. पंचनामे करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पंचनामे करायला शासकीय कर्मचारी येतील तेव्हा त्यांना हे काळजीपूर्वक दाखवा, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धाराशिव जिल्ह्यातील अन्य काही गावांतही वादळी वारे, पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडून अंगावर पडल्यामुळे दुभती जनावरे जखमी झाली आहेत. फळपिकांचेही नुकसान झाले आहे. आमदार पाटील यांनी शेतात जाऊन या नुकसानीची पाहणी केली.
शासकीय कर्मचाऱ्यांकडून या नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत, असे आमदार पाटील यांनी संबंधित नागरिकांना सांगितले. आपल्या वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून राजकीय नेत्यांना लोकांच्या अडीअडचणींना धावून जावे लागते.
डॉ. पद्मसिंह पाटील हे सोलापूरच्या रुग्णालयात दाखल आहेत. लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी सुरुवातीला याची माहिती देण्यात आली नव्हती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.