

Marathwada Politics News : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील भेटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आॅपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे सांगीतले जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख जाहीर केले आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे भास्कर आंबेकर, आनंदराव जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा, महाराष्ट्रात महायुतीचे पानीपत झाले होते. विशेषतः मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा सोडता एकही खासदार महायुतीला निवडून आणता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने लोकसभा मतदारसंघात संपर्क व संघटन वाढवण्याच्या दृष्टीने लोकसभा संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या केल्याचे समजते.
मराठवाड्यातील शिवसेना-महायुतीचे एकमेव खासदार संदीपान भुमरे यांच्यावर शेजारच्या जालना लोकसभा मतदारसंघासाठी संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर ज्या नांदेड जिल्ह्यात कधी काळी शिवसेनेची मोठी ताकद होती, तिथे पुन्हा जम बसवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना लोकसभेचे संपर्क प्रमुख करण्यात आले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी जालन्यातील भास्कर आंबेकर हे संपर्कप्रमुख असणार आहेत. पक्षफुटीनंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेल्या भास्कर आंबेकर यांनी काही महिन्यांपुर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी परभणी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली आहे.
बीड, धाराशिव, लातूर या तीन लोकसभा मतदारसंघावरही एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. महायुतीमध्ये बीड, लातूर हे मतदारसंघ भाजपाकडे तर धाराशीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. भविष्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता या तीनही मतदारसंघात पक्षाला अधिक बळकटी मिळावी, संघटना वाढीस लागावी या दृष्टीने अनुक्रमे मनोज शिंदे, माजी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावर संपर्क प्रमुखपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेची एकमेव जागा महायुतीने जिंकली होती. शिवसेनेचे संदीपान भुमरे हे सव्वा लाखाहून अधिक मतांच्या फरकाने ते निवडून आले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी विलास पारकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पारकर यांची भूमिका महत्वाची ठरली होती. आता लोकसभेसाठी संपर्कप्रमुख म्हणून पारकर यांच्यावरच शिंदे यांनी विश्वास दाखवला आहे.
हिंगोली - आनंदराव जाधव
नांदेड-दत्ता दळवी
परभणी-भास्कर आंबेकर
जालना- खासदार संदीपान भुमरे
संभाजीनगर- विलास पारकर
बीड-मनोज शिंदे
धाराशीव- माजी खासदार उन्मेष पाटील
लातूर- मंगेश कुडाळकर आमदार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.