

Solapur, 31 March : सोलापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे परिवहन विभागाच्या ‘चेसी क्रॅक’ प्रकरणावर बोलत होते. या प्रकरणात महापालिकेचे तब्बल ५७ कोटी रुपयांचा दंड झाला आहे, त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित करताचा भाजप नगरसेवकोन पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे हरकतीचा मुद्दा मांडला. त्यामुळे चिडलेल्या शिंदे यांनी भाजप नगरसेवक प्रशांत पल्ली यांना माझं भाषण थांबवणारा तू कोण? असे एकेरी भाषेत सुनावले. त्यामुळे वाद वाढत गेला, शेवटी सभागृह नेत्यांसह भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा सोमवारी झाली. त्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांचे अंदाजपत्रकावरील सूचना व उपसूचनांवर भाष्य सुरू होते, त्यावेळी शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी परिवहन उपक्रमातील ‘चेसी क्रॅक’ बस प्रकरणावर भाष्य केले. महापालिकेला बसलेल्या तब्बल ५७ कोटींच्या दंडाचा मुद्दा मांडला.
अमोल शिंदे शिंदे बोलत असताना भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) प्रशांत पल्ली यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पल्ली यांच्यावर हल्लाबोल केला.
‘मी बोलत असताना मध्ये का येतोस? मला थांबवणारा तू कोण?’ अशा एकेरी शब्दांत शिंदे यांनी पल्ली यांना फटकारले, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. नगरसेवक पल्ली यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे अधिकच आक्रमक झाले आणि ते पल्ली यांच्या दिशेने जाऊ लागले.
शेवटी सभागृह नेते नरेंद्र काळे, रोहिणी तळवळकर, अनंत जाधव यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. भाजपचे राजू पाटील अर्धा तास बोलत असताना आम्ही एकही अडथळा आणला नाही, आता आम्ही बोलत असताना अडथळे कशाला आणता, असा सवाल काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी केला.
महापौर विनायक कोंड्याल यांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आदेश दिले आणि काही वेळातच तणाव निवळला. वातावरण शांत झाल्यानंतर अमोल शिंदे पुन्हा उभे राहत ५७ कोटींचा दंड महापालिकेला परवडणारा आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला.
चेसी क्रॅक बस प्रकरणाबाबत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या कार्यवाहीचे स्पष्टीकरण दिले. आयुक्तांच्या उत्तरावर शिंदे यांचे समाधान न झाल्याने महापौरांनी स्वतंत्र विशेष बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अखेर महापौर कोंड्याल यांनी शिंदे यांची ही मागणी मान्य करत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे तणाव निवळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.