Eknath Shinde : मुख्यमंत्री सत्तारांच्या पाठीशी `चट्टान` सारखे उभे राहणार ?

Winter Session : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आमच्या पाठीशी`चट्टान`सारखे उभे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.
Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Maharashtra Politics : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला एक आठवडा पुर्ण झाला आहे. या काळात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, दिशा सालियान प्रकरण आणि आता कृषी महोत्सव, गायरान जमीन वाटप प्रकरणावरून राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सभागृहात न बसता विधान भवनाच्या पायऱ्यावर उभे राहून एकमेकांविरुद्ध आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) दुसरा आठवडा आज सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार गोत्यात आले.

Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, Aurangabad
Winter Session : भुखंड ढापणे, महिलांना शिवीगाळ अन् वसुली एवढेच या मंत्र्यांचे काम..

मतदार संघातील कृषी महोत्सवासाठी १५ कोटींची वसुली प्रवेशिकांच्या माध्यमातून करण्याचा आरोप आणि नागपूर खंडपीठाने ३७ एकर गायरान जमीन वाटप प्रकरणी ओढलेले ताशेरे यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफुटवर गेल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सभागृहात नसतांना त्यांच्या लाडक्या मंत्र्याला घेरण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तुर्तास हाणून पाडला आहे. (Abdul Sattar) कृषी महोत्सवाच्या संदर्भात झालेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली जाईल, अशा प्रकारे वसुली केली जात असेल तर कारवाई केली जाईल, असे उत्तर फडणवीसांनी सभागृहात आक्रमक झालेल्या विरोधकांना दिले.

मात्र कारवाई नेमकी कोणावर करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. तर तिकडे दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा कृषीमंत्री सत्तारांवरील आरोप आणि त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची होत असलेली मागणी यावर छेडले तेव्हा शिंदेंनी विरोधी पक्षाचीच प्रकरणे तपासली जातील, अशी भूमिका घेत सत्तारांचा बचाव केला. त्यामुळे कृषीमंत्री आपल्यावर झालेल्या आरोपांना उद्या सभागृहात काय उत्तर देतात, आणि राजीनाम्याच्या मागणीवर सरकाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यातील सत्तातंरानंतर जेव्हा मंत्रीमंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा अचानक टीईटी घोटाळा आणि त्यात मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या सत्तारांच्या मुला-मुलींची नावे समोर आली होती. ऐन मंत्रीमडळ विस्ताराच्यावेळी या प्रकरणाने डोके वर काढल्यामुळे सत्तारांची गच्छंती होणार असे आडाखे लावले जात होते. पण तेव्हा मुख्यमंत्री शिंदे सत्तारांच्या पाठीशी `चट्टान` सारखे उभे राहिले. मंत्रीपद मिळते की नाही, असे वाटत असतांना आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या सत्तारांना प्रमोशन तर मिळालेच, पण कृषी सारखे महत्वाचे खातेही मिळाले.

मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद पाठीशी असल्यामुळे सत्तारांची गाडी सुसाट सुटली. मंत्रीमंडळाच्या बैठीकत झालेल्या चर्चेची परस्पर घोषणा करत सत्तारांनी पुन्हा वाद ओढावून घेतला. सत्तांतराचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाले, पण तिथेही पुन्हा शिंदे`चट्टान` बनून सत्तारांच्या पाठीशा उभे राहिले. पण सत्तारांनी यातून काही बोध घेतला नाही आणि मग पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का? या त्यांच्या विधानाने रान पेटले. पण सत्तारांचे नशिब बलवत्तर म्हणा की, मग त्यांच्या पाठीशी असलेली `चट्टान`, त्याकडेही कानाडोळा केला गेला.

Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, Aurangabad
Winter Session : अब्दुल सत्तारांची एक नाही, अशी पाच प्रकरणे ; त्यांचा राजीनामा घ्याच..

पण यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत सत्तारांनी मोठे धाडस केले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरत महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांना एकाच वेळी अंगावर घेतले. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू झाले, आता सत्तारांची गच्छंती अटळ, असे वाटत असतांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री `चट्टान` बनून उभे राहिले. काही दिवस गप्प बसा, दौरे करू नका, अशा सूचना सत्तार यांना देण्यात आल्या. सरकार ऐकत नाही म्हटल्यावर राष्ट्रवादीचे अवसान देखील गळाले आणि सत्तारांच्या विरोधातील आंदोलने बंद झाली.

पुन्हा सत्तार कामाला लागले आणि आता मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सव भरवण्याच्या हट्टातून त्यांनी किंवा त्यांच्या विभागाकडून सुरू झालेल्या वसुली मोहिमेने त्यांना पुन्हा अडचणीत आणले. विशेष म्हणजे विधीमंडळाचे नागपूरातील अधिवेशन सुरू असतांनाच हे प्रकरण समोर आणले गेले. त्यात भर पडली ती नागपूर खंडपीठातील गायरान जमीन वाटपाच्या प्रकरणाची. ही दोन मोठी प्रकरणे हाताला लागल्यामुळे विरोधी पक्ष या संधीचा लाभ उठवणार नाही तर नवलच. अजित पवार, अंबादास दानवे या दोन विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पायऱ्यावर निदर्शने केली.

पुन्हा आता सत्तारांचे काही खरे नाही? त्यांचे मंत्रीपदा जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण या प्रकरणावर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतलेली भूमिका आणि तिकडे दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा बरंच काही सांगून जातो. राज्यात सत्तांतर होवून शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा विश्वासदर्शक ठरावाच्यावेली त्यांनी सभागृहात केलेले भाषण या निमित्ताने आठवते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आमच्या पाठीशी `चट्टान`सारखे उभे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते. तेच शिंदे आज आपल्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप झाले, तरी त्याच्या पाठीशी `चट्टान`सारखे उभे राहतांना दिसत आहेत. एकंदरित महाविकास आघाडीच्या दबावाला बळी पडायचे नाही, बॅकफुटवर जायचे नाही हे शिंदे-फडणवीस सरकारचे धोरण याही वेळी सत्तारांच्या पथ्यावर पडणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com