

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान अधिकार पदाची जबाबदारी सोपवताना महापालिकेकडून गंभीर चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने दोन दिवंगत शिक्षकांवर मतदान अधिकार पदाची जबाबदारी सोपवली. ज्या दिवंगत शिक्षकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यापैकी एकाचा मृत्यू तीन महिन्यापूर्वी तर एकाचा तेरा महिन्यांपूर्वी झालेला आहे.
महापालिकेने या शिक्षकांच्या नावे प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून राज्यशिक्षक सेनेने महापालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे तीन महिन्यापूर्वी तर राजेश बसवे यांचे 13 महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. असे असताना त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
विशेष म्हणजे हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या लक्षातही आला नाही आणि त्यांनी या दोन मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसही बजावली. तसेच कामात हलगर्जीपणा दाखवल्या बाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून 24 तासात सादर करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिलेल्या नोटिसीत देण्यात आला होता.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विधानसभा निवडणुकीतील कर्मचाऱ्यांची यादी घेतली होती. यात मृत असलेले कर्मचारी, बदली झालेली कर्मचारी यांची यादी वेगळी केलेली आहे. मात्र वेळ अत्यंत कमी मिळाल्याने यामध्ये काही प्रमाणात चुका राहू शकतात. आम्ही कर्मचाऱ्यांची यादी जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगत मनपा उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सारवासारव केली.
दुसरीकडे राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना महापालिकेच्या या गंभीर चुकीवर संतापले आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, नियम पालन आणि मानवी संवेदनशीलतेचा अभाव दिसत असल्याची टीका अमोल एरंडे यांनी केली आहे. मृत शिक्षकांची निवडणूक ड्युटीसाठी नियुक्ती करणे ही गंभीर चूक आहे. आता त्यांना कर्तव्यावर उपस्थित राहिल्याबद्दल नोटीस प्राप्त झाली आहे. एक प्रकारे मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या भावनेशी प्रशासन खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.