

Bandra MNS leaders resign : महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाची राजकीय ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांना याचा फायदा होईल, अशी चर्चा रंगलेली असतानाच मनसेसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे हा मनसेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात मात्र पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे.
वांद्रेतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील तब्बल 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत मनसेच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या राजीनाम्यांमुळे स्थानिक पातळीवर असलेले राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या ‘मशाल’ या चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवल्याने अनेक मनसैनिक नाराज झाले होते. पक्ष स्थापनेपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निर्णय मान्य नव्हता. आपले मत आणि भावना डावलण्यात आल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे राजीनामा देणारे हे पदाधिकारी कालपरवाचे नव्हते. गेल्या 19 वर्षे 9 महिन्यांपासून त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. पक्ष उभा राहत असताना रस्त्यावर उतरून संघटन वाढवण्यापासून ते निवडणुकांमध्ये पक्षासाठी झटण्यापर्यंत त्यांचा मोठा वाटा होता. अशा अनुभवी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या बंडखोरीचा मनसेला नेमका किती फटका बसेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या घडामोडींमुळे मनसेच्या अंतर्गत नाराजीनाट्यावर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. वांद्रे हा भाग मनसेसाठी महत्त्वाचा मानला जातो. अशा ठिकाणी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पक्षा झालेली ही फूट चिंतेची बाब ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.