
Nanded NCP News : नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष होण्यासाठी धडपडत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गटबाजीला उधान आले आहे. नव्या आणि जुन्या पदाधिकारी नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाल्यामुळे अजित पवारांच्या नांदेड मोहिमेला धक्का लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षात प्रवेश केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यावर गेल्या 30 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सध्याचे शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी निशाणा साधला आहे.
माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या पक्षात नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचे उद्योग सुरू केले आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे नेते (Ajit Pawar) अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घ्यावी, असे आवाहन जीवन घोगरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे नांदेडमध्ये आले असताना त्यांना आपल्या पक्ष कार्यालयाला भेट देण्याची विनंती जीवन घोगरे पाटील यांनी केली होती.
मात्र नव्यानेच पक्षात आलेले जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी झिरवळ यांना थेट रेल्वे स्टेशनला नेले. त्यामुळे घोगरे पाटील यांचा पारा चांगलाच चढला. मी गेल्या 30 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) एकनिष्ठ आहे. अजित पवार, शरद पवार या नेत्यांवर माझा संपूर्ण विश्वास आहे. परंतु नेत्यांची दिशाभूल करून निष्ठावंतांवर अन्याय करण्याचे प्रयत्न काल-परवा पक्षात आलेल्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे, असा आरोप जीवन घोगरे पाटील यांनी केला.
इतर पक्षातून विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या ऑफर आल्या, मात्र आम्ही पक्षाशी असलेली निष्ठा सोडली नाही. नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी आवरावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही जीवन घोगरे पाटील यांनी दिला. नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या इतके सुसज्ज असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय नाही, म्हणून स्थानिक नेत्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांना माझ्या कार्यालयात येऊ दिले नाही, असा आरोप घोगरे पाटील यांनी केला.
आमचे नेते अजित पवार तीन वेळा नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर आले त्यांनाही नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन पक्ष कार्यालयात येण्यापासून रोखले. जे आज पक्षात आले आहेत ते पद किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाले नाही तर पाच वर्ष पक्षात राहतील की नाही, याची खात्री देता येत नाही असा टोलाही घोगरे पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांना नाव न घेता लगावला. एकूणच नांदेड जिल्ह्यात सुसाट निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडीला पक्षांतर्गत गटबाजीने ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.