Chhatrapati Sambhajinagar : आस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मंत्र्यांची नावे सांगून फसवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए असल्याचे सांगत एका भामट्याने शेतकर्याला चक्क क्युआर कोड पाठवून पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवर आपली व्यथा या शेतकर्याने मांडली होती. त्यावर तुमचे काम करून देतो सांगत या महाशयाने थेट बावनकुळे यांचा पीए असल्याची बतावणी केली.
फसवणूक करू पाहाणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही (Fir Filed) दाखल केला आहे. मंत्र्यांची नावे सांगून फसवण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण, बावनकुळे साहेबांचे पीए असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीने संबंधित शेतकऱ्याला फोन करुन काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर, स्कॅनर पाठवत पैसे पाठवण्याची मागणी केली होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. जगन्नाथ जयाजी शेळके असे तक्रारदार शेतकर्याचे नाव आहे. काही दिवसापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी आपली अडचण मांडली होती. आजूबाजूच्या शेतकर्यांनी रस्ता अडवल्यामुळे माझी वडिलोपार्जित शेती पडीक पाडली आहे, त्यामुळे मला लागवड करता येत नाही, असे त्यांनी यात म्हटले होते.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने पीडित शेतकर्याला फोन लावून, मी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पी.ए. बोलत असल्याचे सांगून रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसे पाठवतो. मात्र, पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरावे लागतील, त्यासाठी क्यूआर कोड पाठवतो त्यावर पैसे पाठवण्याची मागणी केली. दोघांमध्ये फोनवर झालेले हे संभाषण शेतकऱ्याने पोलीसांना ऐकवले. विशेष म्हणजे स्वतःला बावनकुळे यांचा पीए सांगणाऱ्या या व्यक्तीने एकदा नाही तर दोनवेळा शेळके यांना फोन केला होता.
आपले काम होणार या आशेने शेतकऱ्याने या व्यक्तीला 3 हजार रुपये देखील पाठवले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचा संशय शेळके यांना आला. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, शेतकर्याची फसवणूक करणारा हा व्यक्ती कोण? याचा तपास पोलीसांनी सुरू केला आहे. कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.