Nanded Flood News : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. जिल्हा प्रशासनासोबत बैठका घेत चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षितते संदर्भात कुठलाही हगर्जीपणा होता कामा नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील नदी, नाल्यांचा वाढता स्तर पाहता तेलंगणा राज्यातील पोचमपाड सारख्या प्रकल्पांचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी बैठकीत केली.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेड जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. हा जिल्हा त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याची भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती चव्हाण यांना चांगलीच माहित आहे. त्यामुळे नैसर्गीक संकटात जिल्ह्यातील यंत्रणा कशी हाताळावी ? याचा मोठा अनुभव मंत्री, खासदार, आमदार नेते म्हणून त्यांना आहे. गेल्या काही दिवसापासून नांदडे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.
सातत्याने सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत, तर शहर आणि ग्रामीण भागही पाण्याखाली गेला आहे. नागरिकांसह शेत पीकांचे नुकसान, जनावरांचा हानी, घरांची झालेली पडझड या सगळ्यामध्ये जीवतहानी होऊ नये, लोकांना तातडीने मदत व्हावी, यासाठी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती घेतल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश अशोक चव्हाण यांनी दिले. (Nanded) महानगरपालिका, महसूल विभाग, विद्युत विभाग आदींनी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना चव्हाण यांनी बैठकीत दिल्या. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचा निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने गस्त घालून परिस्थितीवर नजर ठेवावी, अशा सूचना देतानाच नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांचा जलस्तर कमी करण्यासाठी तेलंगणातील पोचमपाड सारख्या प्रकल्पांचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. काल दिवसभर नांदेड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील नागरिकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती अशोक चव्हाण यांना दिली.
त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला चव्हाण यांनी कल्पना दिली होती. भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर व मुदखेड या दोन तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून, आवश्यक तिथे मदत पथके पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असे चव्हाण यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.