Sharad Pawar On Mahanor : विधान परिषदेत महानोर बारा वर्ष शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयावरच बोलले..

Sharad Pawar News : शेतीबद्दलची त्यांची आस्था जे कोणी त्यांच्या शेतात गेला असाल त्यांच्या लक्षात येईल.
Sharad Pawar On Mahanor
Sharad Pawar On Mahanor Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : रानकवी दिवंगत ना.धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित `पक्षी दूर देशी गेलं`, या काव्य आदरांजली कार्यक्रमात महानोर यांचे मित्र आणि त्यांच्याशी कायम जिव्हाळ्याचे संबंध असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. (Sharad Pawar On Mahanor) महाराष्ट्राच्या विधानसभेतून विधान परिषदेत त्यांना जायची संधी मिळाली त्यांनी या काळात म्हणजेच तब्बल १२ वर्ष शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधित विचार मांडले, जे प्रत्येक सदस्यांनी ऐकायला हवे. अलीकडच्या काळामध्ये महानोर एका वेगळ्या स्थितीत होते. त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यानंतर हा गृहस्थ सावरलाच नाही, असे सांगतांना पवारांचा कंठ दाटून आला होता.

Sharad Pawar On Mahanor
ना. धो. महानोर यांचे दु:खद निधन, Sharad Pawar यांनी सांगितल्या आठवणी | Namdeo Dhondo Mahanor Death

आज त्यांनी जे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलेले आहे, ते कधीही विसरलं जाणार नाही, असेही ते म्हणाले. (Sharad Pawar) नामदेवासाठी शोक सभेतून कधी जमा होऊ असे वाटत नव्हते. गेल्या अनेक वर्षांचा माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध त्यासंबंधाचा प्रतिबंध कधी झाला नाही. (Aurangabad) नाधो त्यांचे कार्य आणि त्यांचे लेखन यासंबंधी जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होतात, नवीन संशोधन येत आहेत, शेतकऱ्यांची प्रगती होते यात त्यांचा अधिक अधिक वाटा आहे.

अनेक वेळा आम्ही पुरस्काराला गेलो असू तिथे गेल्यानंतर शेतातली त्यांची बाग असो ज्यात विविध पद्धतीची सिताफळे त्यांच्या झाडाला पाहायला मिळत. शेतीच्या बाहेर एकाही विषयावर आमच्या गप्पागोष्टी होत नसत. (Marathwada) जे काही लिखाण झाले ते शेतकरी, त्याची शेती आणि पीक यासंबंधीच असायचे. अलीकडच्या काळात शेतीवरच ते लक्ष केंद्रित करत होते, असेही पवारांनी सांगितले. काव्य, लेख आणि लघुलेख महानोरांचा या सर्व क्षेत्रात शेती हा विषय अग्रस्थानी ठेवून त्यांनी त्यांचे ठिकाण प्रस्थापित केले.

पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मुखातून त्यांची गाणी अनेक ठिकाणी ऐकायला मिळायची. त्या गाण्यांचा मनापासून स्वीकार मराठी माणसाने केलेला दिसतो. त्यांना शेतीचे ज्ञान व आस्था होती. पाणी हा शेतीचा अत्यंत महत्वाचा भाग आणि पळसखेडी आणि तो सर्व परिसर दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाला तिथे महत्व आहे. ते नेहमी जल सिंचनाचे महत्व सांगत असत. शेतीबद्दलची त्यांची आस्था जे कोणी त्यांच्या शेतात गेला असाल त्यांच्या लक्षात येईल.

महाराष्ट्राच्या विधानसभेतून विधान परिषदेत त्यांना जायची संधी मिळाली त्यांनी या काळात म्हणजेच तब्बल १२ वर्ष शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधित विचार मांडले, जे प्रत्येक सदस्यांनी ऐकायला हवे. तासन्‌तास ते बोलायचे त्यांच्यावर कोणी कधी वेळेची मर्यादा केली नाही. ते असे मुद्देसूद भाषण करायचे की, सर्व ऐकत बसायचे. अतिशय उत्तम अशा प्रकारचे त्यांचे व्याख्यान असायचे, अशी आठवणही पवारांनी सांगितली.

Sharad Pawar On Mahanor
Latur District News : लातूर जिल्हा निर्मितीची आठवण ठेवत विलासरावांनी अंतुलेंना बोलावले..

एकदा मला काहीतरी कामासाठी अमेरिकेला जायचे ठरले. मी त्यांना सोबत चला म्हटले, पण त्यांनी मला एक अट टाकली. ती अट होती, मला अमेरिकेतली शेती बघायची आहे. मी त्यांची अट मान्य केली आणि त्यांना तयार केले. शर्ट आणि पायजमा याच्यावर ते जायला तयार नव्हते. पण बराच आग्रह केल्याच्यानंतर मला आठवतेय की मी एका टेलरला बोलावले आणि म्हटले कमीत कमी यांचे पॅन्ट आणि शर्टच माप घ्या आणि काही ड्रेस आणून द्या. झाले काम आणि अगदी नाईलाजाने त्यांनी पॅन्ट आणि शर्ट परिधान केले आणि विमानामध्ये बसले.

तिथे गेल्यानंतर आम्ही अमेरिकेची शेती, त्याचं अर्थशास्त्र, त्यांनी केलेला नवीन संशोधन याच्यावर अत्यंत सखोलपणाने अभ्यास करण्याची भूमिका ते सातत्याने घेत होते. अमेरिकेची बाकीची प्रगती यासंबंधीची आस्था त्यांना नव्हती. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये उतरल्यानंतर तिथली काही माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केला, तर ते कटाक्षाने सांगायचे यासाठी आपण नंतर वेळ काढूया. पण शेतीचे काय याबद्दल मला माहिती द्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने, अखंडपणाने शेतकऱ्यांबद्दल आस्था ठेवणारा असा महानोर आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये नाही. एकदा बोलायला लागले तर त्यांचे बोलणे थांबायचे नाही. एखादे काव्य किंवा त्यासंबंधीचा विषय असेल की ते सलग बोलायचे.

पु.लं.नी दिले रानकवी नाव..

मला आठवतंय एक दिवशी पु. ल. देशपांडे यांनी त्यांचे प्रदीर्घ भाषण ऐकल्यानंतर त्यांना सांगितलं नामदेव तुझं नाव मी आजपासून बदलतोय, तू रानकवी आहेस. एकदा तू सुरुवात केली, बोलायला लागलास की रान मला आठवतं, पु. ल. देशपांडे यांनी असा उल्लेख त्यांचा केला होता. हे ठिकाण मराठी क्षेत्रातले नामवंत साहित्यांबद्दल एका दृष्टीने पवित्र असे ठिकाण होते. तिथे कधी ग. दि. मा. जातील, कधी पु. ल. देशपांडे जातील व कधी लताबाई. अनेक अशा महत्वाच्या कर्तृत्ववान कविता आणि संगीतात ज्यांचे योगदान आहे असे अनेक लोक जाऊन आले, आणि त्यांचा पाहुणचार त्यांनी घेतला. त्याहीपेक्षा शेतीच्या संबंधितील त्यांची आस्था समजून घेण्याचा काम त्यांनी केले.

अलीकडच्या काळामध्ये महानोर एका वेगळ्या स्थितीत होते. त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यानंतर हा गृहस्थ सावरलाच नाही. मी आणि माझी पत्नी आम्ही अनेकवेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गप्पा- गोष्टी केल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो खचला आणि एकदिवशी आपल्यातून निघून गेला. आज त्यांनी जे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलेले आहे, ते कधीही विसरलं जाणार नाही. आज याठिकाणी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही जी शोकसभा आयोजित केली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अधिक बोलण्याचा हा प्रसंग नाही, अशा शब्दात पवारांनी महानोरांच्या आठवणींना उजाळा दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com