Beed News : मागील 50 वर्षात जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतलेल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. आपण कधीही राजकीय स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, जनतेचा कौल असेल तोच आपला राजकीय निर्णय अशी भूमिका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे.
क्षीरसागरांच्या राजकीय घराण्यात सर्वात थोरले असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना सहा वर्षांपूर्वी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून आव्हान दिले. त्यावेळच्या नगर पालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी आपले धाकटे बंधू डॉ. भरतभूषण क्षीरसागर यांच्या पारड्यात वजन टाकले. त्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचेच बंधू व संदीप क्षीरसागर यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्याचे उट्टे संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करुन काढले.
दरम्यान, तत्पुर्वी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. मात्र, शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असूनही नऊ महिन्यांपूर्वी शहरातील नगरोत्थान योजनेतील रस्ता व नाली कामांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्याने क्षीरसागर बंधूना पक्षातून काढून टाकण्यात आले. मागील नऊ महिन्यांपासून दोघेही पक्षाविना आहेत. दरम्यान, पुर्वी पालिका हद्दीचे क्षीरसागरांचे डॉ. क्षीरसागर सांभाळत असलेले राजकारण आता त्यांचे पुत्र डॉ. योगेश यांनी हाती घेतले आहे. राज्यातील नव्या राजकीय समिकरणानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मात्र, राजकीय वाटचाल आणि अनुभवाने जयदत्त क्षीरसागर सिनीअर असल्याने धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) नेतृत्व कसे मान्य करायचे याचा त्यांना पेच आहे. तर, 'सेटल' झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर 'जड' जातात हा त्यांचा पुर्वानुभव असल्याने धनंजय मुंडेंनाही ते यावेत असे फारसे वाटत नव्हते. या सर्व कारणांनी 'आपण थांबू योग्य वेळेची वाट पाहू' असा जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे योगेश क्षीरसागरांना सल्ला होता. मात्र, महिनाभराच्या राजकीय खलबत्यानंतर त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेशाचा निर्णय पक्का केला.
येत्या एक दोन दिवसांत पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कृषीमंत्री मुंडेंच्या उपस्थितीत डॉ. क्षीरसागर यांचा प्रवेश होऊ शकतो. आता जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवरुन यावर मोहर लागली आहे. दरम्यान, विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालु राहील. सध्या सुरू असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही. भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल. माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही. जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.