Hingoli News :: माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या रजनी सातव (वय 76) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळीच उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते, मात्र संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिवंगत राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.
दरम्यान, रजनी सातव यांच्यावर उद्या (सोमवारी) दुपारी 12 वाजता कळमनुरीमधील विकास नगर याठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत.
रजनी सातव यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९८० आणि १९८५ अशा दोन टर्म त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९० मध्ये मात्र तिसऱ्या वेळेस निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जून १९८५ ते मार्च १९८६ या कालावधीत त्यांना राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली. हिंगोली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण स्थान होते.
कॉंग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या. आईकडून मिळालेला राजकीय नेतृत्वाचा वारसा राजीव यांनी समर्थपणे सांभाळला आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत पुढेही नेला. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशी उज्ज्वल राजकीय कारकीर्द असणारे राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सल्लागारांपैकी एक होते. मात्र कोरोना महामारीमध्ये त्यांना कोरोनाने ग्रासले आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यानंतर आपल्या सून आणि नातवंडासाठी आधार बनून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. सून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून घरातील राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारत जोडो यात्रेच्या दरम्यान पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या घरी भेट दिली होती. यावेळी राहुल यांच्या रुपात राजूच घरी येतोय, अशी भावना व्यक्त केली होती. भावनाविवश झालेल्या रजनीताई सर्वांनी बघितल्या आहेत.
रजनीताई सातव यांच्या जाण्याने जुन्या पिढीतील मातब्बर कॉंग्रेस नेत्या गमावल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे. पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना आणि त्यामुळे पक्षाची वाताहत होत असताना कॉंग्रेस पक्षाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले नेते काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दु:ख तीव्र असल्याच्या भावना कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे.
चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात त्यांनीच सक्रिय केले होते. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या सून आमदार प्रज्ञा सातव (Pradnya satav) यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत.