

NagarPalika Nivadnuk Nikal : फुलंब्री नगरपरिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरूंग लावत महाविकास आघाडीने चमत्कार घडवला. नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपच्या सुहास शिरसाट यांचा 1797 मतांनी पराभव करत धक्का दिला.
भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होती. भाजपच्या नेत्यांनी पूर्ण ताकद सुहास शिरसाट यांना निवडून आणण्यासाठी लावली होती. परंतु राजेंद्र ठोंबरे यांनी अल्पसंख्याक समाजाची मतं आपल्याकडे वळवत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावत नगराध्यक्षपद पटकावले. या निमित्ताने नगर परिषदेवरील भाजपची सत्ताही महाविकास आघाडीने हिसकावून घेतली आहे.
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत यंदा मतदारांनी स्पष्ट कौल देत महाविकास आघाडीच्या राजेंद्र ठोंबरे यांच्या पारड्यात विजय टाकला आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भाजपचे सुहास शिरसाठ यांचा तब्बल 1797 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदी दिमाखात विराजमान झाले आहेत.
2017 मध्ये नगरपंचायत निवडणुकीत केवळ 190 मतांनी पराभव पत्करावा लागलेला राजेंद्र ठोंबरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. त्या पराभवाची सल मनात ठेवत त्यांनी यावेळी जोरदार तयारी, व्यापक संपर्क आणि संघटित प्रचाराच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला. त्याचाच परिणाम म्हणून 2025 च्या नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आठ वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला आहे.
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांना 8214 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांना 6417 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमधील मतांचे अंतर तब्बल 1797 इतके असल्याने हा विजय एकतर्फी ठरला असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व सिद्ध केले आहे.
एकूण 17 नगरसेवकांच्या जागांपैकी महाविकास आघाडीला सर्वाधिक 12 जागा मिळाल्या आहेत. याउलट भाजपला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी (BJP) मोठा राजकीय धक्का मानली जात आहे. या निकालानंतर फुलंब्री शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी जल्लोष, फटाके फोडून आणि गुलाल उधळत विजय साजरा करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.