Gangadhar Gade News : पँथर्सला तळागळात पोहचवणारा नेता हरपला; माजी मंत्री गंगाधर गाडेंची 'एक्झिट'

Gangadhar Gade Passed Away : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाहनासमोर स्वत: ला झोकून देत आंदोलन करत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला होता.
Gangadhar Gade News
Gangadhar Gade NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : आंबेडकर चळवळीतील नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (वय 76) यांचे शनिवारी (ता. चार) सकाळी साडेचार वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार (ता. पाच) दुपारी 12 ते 4 या वेळेत संभाजीनगरातील उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गंगाधर गाडे यांचे मूळ गाव कवठळ (ता. मोर्शी, जि. अमरावती) हे आहे. त्यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे तर महाविद्यालयीन शिक्षण हे छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलींद महाविद्यालयात झाले.

रिपब्लिकन स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाची त्यांनी स्थापन केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या प्रश्नावर स्वतःला झोकून दिले. शिष्यवृत्ती वाढीच्या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची आमखास मैदानावर सभा त्यांनी उधळून लावली होती. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, गोरगरीबांना घरे मिळावेत म्हणून शहरात अनेक झोपडपट्‍या बसवल्या, यात त्यांनी आठ महिने तुरुंगवास भोगला.

राजा ढाले यांनी पँथर बरखास्त केल्यानंतर गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी प्रवक्ते म. भी. चिटणीस यांच्या साक्षीने पँथरची नव्याने सुरुवात केली. दरम्यानच्या काळात गाडे यांनी तत्कालीन राज्य विद्युत मंडळात काही काळ नोकरीही केली. 1977 मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी गाडे यांनी प्रदीर्घ संघर्ष केला.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या वाहनासमोर स्वत: ला झोकून देत आंदोलन करत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला होता. या आंदोलनाचे ते अग्रणी नेते म्हणून ओळखले जातात. तब्बल 17 वर्ष ही मागणी त्यांनी रेटून धरली. दलित बहुजन व अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली. त्यानंतर शाळा, महाविद्यालयांची स्थापना केली.

राज्यात जिथे जिथे दलित अत्याचाराच्या घटना घडल्या तिथे जावून आंदोलने करुन न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रसंगी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. गंगाधर गाडे हे काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये 27 ऑक्टोबर 99 ते 27 एप्रिल 2000 असे सहा महिने परिवहन खात्याचे राज्यमंत्री होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Gangadhar Gade News
Mahadev Jankar : म्हणायचं होतं भाबडा, पण म्हणाले...'; बारामतीत अजितदादांबाबत जानकर हे काय बोलून गेले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com