Nanded News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर जावे लागले. नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असताना त्याठिकाणी भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही भाजपमधील अंतर्गत गटबाजी थांबताना दिसत नाही.
पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी केलेल्या वक्तव्याने माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा या बैठकीनंतर ऐकावयास मिळत होती. (Girish Mahajan News)
नांदेडमधील भाजपच्या आमदारांनी दिलेली यादी खासदारांनी रद्द केली तर खासदारांनी दिलेल्या यादीतील काही नावाला आमदारांनी विरोध केला. त्यामुळे शासकीय समित्यांवर कार्यकर्त्याना संधी देता आली नाही, अशा शब्दांत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhlikar) यांना टोला लगावला.
पालकमंत्री गिरीश महाजन शनिवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. या बैठकीनंतर नियोजन समितीचा कार्यकाळ संपत आला असला तरी शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला.
यावर बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी नेमणूक करण्यात आलेल्या नियोजन समितीत सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षापूर्वी मी पालकमंत्री झालो. त्यानंतर सदस्य बदलाची प्रक्रिया सुरु ही करण्यात आली होती.
काही ठिकाणी कुणाला घ्याचे काही ठिकाणी कुणाला नको, यावरून बरेच मतभेद झाले. भाजपच्या आमदारांनी दिलेली यादी खासदारांनी रद्द केली तर खासदारांनी दिलेल्या यादीतील काही नावाला आमदारांनी विरोध केला.
त्यामुळे शेवटपर्यंत यामध्ये एकवाक्यता दिसली नाही. ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. त्यामुळे शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही, याची कबुली महाजन यांनी बैठकीवेळी दिली. महाजन यांनी केलेल्या या वक्तव्याने माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा या बैठकीनंतर ऐकावयास मिळत होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.