mla pradnya Satav
mla pradnya SatavSarkarnama

Pradnya Satav Godfather : प्रज्ञा सातवांचा माजी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने भाजप प्रवेश? "गॉडफादर"शी चर्चा झाल्यानंतरच आमदारकीच्या राजीनाम्याचे धाडस!

Pradnya Satav resignation after BJP entry : प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण होते का? राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
Published on

Hingoli Congress BJP news : काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांनी आज विधान भवनात आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर्गत विरोधकांना काँग्रेस नेत्यांकडून दिले जाणारे बळ कार्यकर्ते, समर्थकांची होणारी कोंडी, रखडलेली विकास कामे अशा तक्रारींचा पाढा वाचत प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची साथ सोडली. परंतु त्यांच्या या भाजप प्रवेशामागे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हेच गॉडफादर असल्याचे बोलले जाते.

त्यांचे प्रयत्न आणि आश्वासन यावर विश्वास ठेवूनच प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची धाडस केल्याची चर्चा आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या इतका राजकीय अनुभव प्रज्ञा सातव यांना नसताना राहुल गांधी यांनी त्यांना एकदा नव्हे तर दोनदा विधान परिषदेची संधी दिली.

mla pradnya Satav
Pradnya Satav : 'हात' सोडून 'कमळ' हातात! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांचा असा आहे राजकीय प्रवास!

हिंगोली जिल्ह्याचे नेतृत्व पक्षाने एकहाती त्यांच्याकडे सोपवले. परंतु प्रज्ञा सातव यांना जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यात अपेक्षित यश मिळाले नाही. उलट राज्यातील नेत्यांच्या तक्रारी दिल्लीपर्यंत करत त्यांनी रोष ओढवून घेतला. याच कारणामुळे प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देण्यावरून पक्षात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यांच्या ऐवजी मुस्लिम चेहरा विधान परिषदेत देऊन पक्षापासून दूर गेलेली काँग्रेसची मुस्लिम वोट बँक पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्यातील नेत्यांचा होता.

आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी पुन्हा दिल्ली गाठत राहुल गांधी यांना साकड घातलं आणि राजीव सातव यांच्याशी असलेल्या मैत्रीखातर राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांचा विरोध डावलून प्रज्ञा सातव यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवले.

आपल्याला राज्यातील नेत्यांनी केलेला विरोध डोक्यात ठेवून प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीमध्ये एकाधिकारशाही सुरू केली, असा आरोप त्यांच्यावर आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून मात्र फारशा प्रतिक्रिया म्हटलेल्या नाहीत. मराठवाड्यातील काँग्रेसच्या काही जिल्हास्तरावरील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रज्ञा सातव यांचे काँग्रेस पक्ष वाढीसाठी कुठलेच योगदान नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे दुःख नसल्याचे सांगितले. उलट त्या पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसला हिंगोलीमध्ये नवीन नेतृत्व निर्माण करता येईल, असेही बोलले गेले.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना हिंगोलीत बऱ्यापैकी लक्ष घालायचे. त्यांचेही प्रज्ञा सातव यांच्याशी फारसे सख्य नव्हते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिंगोलीमध्ये जेव्हा काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची याचा विचार सुरू होता तेव्हा एका सभेत अशोक चव्हाण आणि प्रज्ञा सातव समर्थकांमध्ये बॅनर फाडण्याचा प्रकारही घडला होता.

परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेसचे अनेक बडे मातब्बर नेते, पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षात येतील ही अपेक्षा काहीशी फोल ठरली होती. नांदेड जिल्हा वगळता अशोक चव्हाण यांना बाहेरच्या जिल्ह्यातील काँग्रेसचे नेत्यांना भाजपमध्ये आणता आले नव्हते. ती संधी प्रज्ञा सातव यांच्या रूपाने चालून आली. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही फारसे जुळत नव्हते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या प्रकरणात नाना पटोले यांचे नाव समोर आल्यामुळे अशोक चव्हाण यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची स्क्रिप्ट लिहिल्याचे बोलले जाते.

काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांना पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्याचा प्लॅन अशोक चव्हाण यांच्या डोक्यातूनच आल्याचे बोलले जाते. भाजपामधील प्रवेशानंतर आमदारकी आणि हिंगोली कळमनुरीसाठी विकास निधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामे अशी मोठी आश्वासने प्रज्ञा सातव यांना देण्यात आल्याचे समजते. प्रज्ञा यांच्या भाजप प्रवेशाचे गॉडफादर हे अशोक चव्हाणच आहेत, असेही आता बोलले जात आहे.

mla pradnya Satav
Pradnya Satav join BJP news : हिंगोलीत काँग्रेसचा सफाया; प्रज्ञा सातव भाजपमध्ये सामील, 'या' एका कारणामुळे फिरली सर्व सूत्रं?

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. परंतु या प्रवेशामागे आपला कुठलाही हात नाही, प्रज्ञा सातव यांच्याशी आपली गेल्या कित्येक दिवसात भेटही नाही असे सांगत चव्हाण यांनी या पक्षप्रवेशापासून दूर राहणे पसंत केले आहे.

विधान परिषद आमदार म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी थेट राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे केलेले धाडस यामागे गॉड फादर अशोक चव्हाण हेच असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com