
सुनील इंगळे
Marathwada : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या हालचालींवरून ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप आहे. भारतीय संविधानाच्या 102 व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक, आर्थिक, राजकीय मागासवर्ग ठरविण्याचा अधिकार हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे. मात्र महाराष्ट्रातील खुल्या जातीला सामाजिक मागास ठरविण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोग किंवा राज्य शासनाला नाही, असे स्पष्ट मत सकल ओबीसी समाजाचे समन्वयक ॲड. महादेव आंधळे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार हे ओबीसी आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी (OBC) समाजाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला केवळ दस्तावेज तपासण्याचे अधिकार होते. मात्र, राज्य शासनाने त्याच्या आधारावर जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे वापरून खोटी कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. खुल्या, एसईबीसी आणि ओबीसी अशा तिन्ही प्रवर्गांतून मराठा समाज आरक्षणाचा फायदा घेत आहे.
प्रशासकीय व राजकीय क्षेत्रात प्रबळ असलेल्या मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मागण्याचा अधिकार नाही. ओबीसींची लोकसंख्या 52 टक्के असली तरी इंद्र सहानी प्रकरणामुळे केवळ 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील साडेतीनशे जातींना या प्रवर्गात स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत शासन दबावाखाली येऊन खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार ओबीसी समाजासाठी अन्यायकारक असल्याचे आंधळे म्हणाले.
शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेली सर्व खोटी कुणबी जात प्रमाणपत्रे त्वरित रद्द करण्यात यावीत. तसेच, 'कुणबी' किंवा 'मराठा कुणबी' जातीचे दाखले मिळवणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणास अपात्र ठरवावे. सर्वोच्च न्यायालयाच्या जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील निर्णयानुसार मराठा समाज आरक्षणासाठी अपात्र आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महेश निनाळे यांनीही सध्याचे आंदोलन दडपशाही आणि बळाच्या जोरावर चालवले जात असल्याची टीका केली. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हिताविरोधात निर्णय घेतल्यास आम्ही ठाम आणि योग्य भूमिका घेऊ. ओबीसी महासंघाच्या सुरू असलेल्या आंदोलनाला सकल ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. ओबीसी समाजाच्या वतीने यावेळी काही महत्वाच्या मागण्याही करण्यात आल्या.
ओबीसी समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे किंवा त्यांना शस्त्र परवाना देण्याची परवानगी शासनाने द्यावी. आमदार आणि खासदार संविधानिक पदांवर असताना मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत आहेत. ही भूमिका पक्षपाती असून संविधान विरोधी आहे. अशा लोकांवर कार्यवाही करावी. तसेच राज्य सरकार किंवा राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याचा अधिकार नाही. त्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करून मर्यादा वाढवावी लागेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.