Beed News : मराठवाड्यातील सर्वाधिक ७०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झालेल्या बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपणच नंबर वन असल्याचा दावा केला आहे. Grampanchayat Election भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी `परळी आणि बीड जिल्ह्यात सरशी आपलीच` म्हणत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी `गुलाल आपलाच` असा दावा करत राष्ट्रवादीच जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे.
मुंडे बहिण-भावाच्या या दाव्यामुळे खरचं कुणाची सरशी झाली ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात (Dhnanjay Munde) धनंजय आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बहिण भावाच्या कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा नेहमीच होते. २०१९ च्या परळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.
अनेकदा दोन्ही बाजुंनी नातेसंबंध झुगारून टीका केल्याचे देखील पहायला मिळाले. विशेषत: धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना पंकजा आणि खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणी त्यांच्यावर तुटून पडल्या होत्या. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व विकासकामांच्या मुद्यावरून मुंडे भगिनींनी धनंजय यांना लक्ष्य केले होते. आज जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर होत असतांना आम्हीच नंबर एक असा दावा करत पुन्हा मुंडे बहिण-भाऊ आमने-सामने आले आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले असून अनेक ठिकाणी आघाडीवर आहेत. सर्व विजयी सरपंच व उमेदवारांचे अभिनंदन, गुलाल आपलाच असा दावा करणारे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
तर दुसरीकडे परळी आणि बीड जिल्ह्यात आमचीच सरशी, बीड जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त भाजप पुरस्कृत उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्वांचे आभार! तसेच ग्रामपंचायत निवडणूक निकालात विजय संपादित केलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. आता बीड जिल्ह्यात नेमका कोणता पक्ष नंबर वन? असा प्रश्न दोघांच्याही समर्थकांना पडला असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.