Hingoli: विद्यमान खासदार असतांना उमेदवारी कापल्याने प्रचंड नाराज असलेले हिंगोलीचे (Hingoli Lok Sabha Constituency 2024) हेमंत पाटील (MP Hemant Patil) सध्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. नाराजीचे कारण आणि भाजपचा विरोध पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली. त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर हे आता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत.
उमेदवार बदलल्याने मनोबल खच्ची झालेल्या शिवसैनिकांना धीर देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोहळीकर यांचा अर्ज भरण्यासाठी हिंगोलीत आले होते. पण हेमंत पाटील यावेळी कुठेही दिसले नाही.
मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली असली तरी त्यांच्या पत्नी राजश्री (Rajshree Patil)यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपली खासदारकी गेली असली तरी पत्नीला निवडून आणण्यासाठी हेमंत पाटील यांनी आपला जुना मतदारसंघ आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाही वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापून राजश्री पाटील यांना देण्यात आली. त्यामुळे तिथेही स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा संघर्ष सुरू आहे. गवळी समर्थकांनी तर थेट काम न करण्याचा इशाराच देऊन टाकला आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांना आगीतून फुफाट्यात पडल्या सारखं झालं आहे. पत्नीला निवडून आणण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात तळ ठोकला असून प्रचाराला सुरवात केली आहे.
स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी पाहता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यक्रत्यांच्या भेटीगाठीवर त्यांनी भर दिला आहे. या शिवाय शिवसैनिकांच्या मनधरणीचे प्रयत्नही हेमंत पाटील करत आहेत. त्यामुळे हिंगोलीचे विद्यमान खासदार असूनही त्यांचा अधिकृत उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना फारसा उपयोग होणार नाही, असेच दिसते.
त्यामुळे कोहळीकर यांच्या प्रचाराची संपुर्ण जबाबदारी ही आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याच खांद्यावर असणार आहे. हेमंत पाटील मात्र पत्नीच्या मतदारसंघातच अडकून पडणार आहेत. नुकतीच हेमंत पाटील यांनी राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयास भेट दिली.
यावेळी वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, देवव्रत डहाके यांच्या उपस्थितीत रात्री एक वाजता बैठक घेतली. राजश्री पाटील यांच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करून महायुतीच्या उमेदवारास विजयी करण्याचा संकल्प केला.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.