Hingoli Constituency and Congress : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून जागावाटपासाठी खलबतं सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य तीन पक्षांसह अन्य सोबत आहेत. प्रत्येक पक्ष स्वतःच्या पारड्यात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याने जागावाटपाचा मुद्दा पक्षश्रेष्ठीसमोरची कठीण समस्या बनला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदी लाट होती. या लाटेत कॉंग्रेसला अतिशय दारुण पराभव पहावा लागला. संपूर्ण राज्यात पक्षाला केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले. मराठवाड्यातील नांदेडमध्ये अशोक चव्हाण(Ashok Chavan) व हिंगोली येथे दिवंगत नेते राजीव सातव यांनी पक्षाची लाज राखली. तेव्हापासून कॉंग्रेस नेतृत्वाला हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल विशेष अपेक्षा आहेत. (Hingoli Loksabha Election 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेडचा काही भाग असल्याने येथे नांदेडच्या राजकीय नेत्यांचा प्रभाव दिसून येतो. 1977 साली हिंगोली लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. जनता पार्टीचे उमेदवार चंद्रकांत रामकृष्ण पाटील यांनी प्रथम खासदार होण्याच्या मान मिळवला. त्यानंतर 1980 ते 1989 अशा सलग तीन निवडणुकामध्ये कॉंग्रेसचे(Congress) उत्तम राठोड यांनी विजयाची हॅटट्रिक केली.
तत्कालीन भाजप(bjp) नेते विलास गुंडेवार यानी शिवसेनेत प्रवेश करून 1991 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तम राठोड यांच्या विजयाची परंपरा खंडित केली. कॉंग्रेसच्या उत्तम राठोड यांच्या निसटता पराभव झाला. अवघ्या साडेतीन हजार मतांनी गुंडेवार विजयी झाले. मात्र शिवसेनेत खासदार झालेले विलास गुंडेवार यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1996 च्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवली.
मात्र त्यांचा पराभव झाला. 1998 मध्ये कॉंग्रेसच्या उमेदवार सूर्यकांता पाटील यांनी विजय मिळवला. 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवत सूर्यकांता पाटील पुन्हा एकदा विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या नेत्या रजनीताई सातव यांचे चिरंजीव राजीव सातव हे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यातील नेतृत्वगुण अचूकपणे हेरले.
राहुल गांधी यांनी सातव यांना अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नेमले. अल्पावधीतच राहुल गांधी यांचे विश्वासू बनलेल्या सातव यांना पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये स्थान मिळाले. 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. पक्षासाठी अतिशय कठीण काळ होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांना उमेदवारी मिळाली. पक्षाच्या विश्वास सार्थ ठरवत सातव यांनी विजय मिळवला. राज्यात केवळ नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे पक्षात राजीव सातव यांचे महत्व वाढले आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल अपेक्षाही.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात दलित,मुस्लीम वोटबँकेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. 1996 व 1999 मध्ये भारिप बहुजन महासंघाचे माधवराव नाईक यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवली होती. 2004 आणि 2009 मध्ये बसपाचा उमेदवार तिसऱ्या तर भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते.
2014 मध्ये बसपाचे उमेदवार चुन्नीलाल जाधव यांनी तिसरे स्थान पटकावले होते. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. आजपर्यंतच्या निकालावरून हेच स्पष्ट होते की, दलित,मुस्लिम मते एकगठ्ठा पडतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी आहे. कॉंग्रेसला विजयाची हमी असल्याने हिंगोलीच्या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हिंगोली साठी कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी त्यादृष्टीने संपर्क सुरु केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक हे सुध्दा इच्छुक असल्याचे समजते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवार म्हणून प्रज्ञा सातव यांना पसंती मिळू शकते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.