Marathwada BJP News : निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज असणारा भाजप लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही मतदारसंघात पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. (Hingoli Loksabha Constituency) डिसेंबरमध्ये हिंगोली जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लागोपाठ दौरे केले आहेत. 2019 च्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता.
निवडून आलेल्या खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी शिवसेनेतील बंडाळीत शिंदे गटाला साथ दिली. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाच्या महायुतीमधील जागावाटपात हिंगोली (Hingoli) मतदारसंघ कोणाकडे असेल याबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदारांचे मतदारसंघ शिवसेना (शिंदे) गटाकडे असतील आणि तुम्ही तयारीला लागा, असे आदेश स्वतः शिंदे यांनी दिल्याचे खासदारानी सांगितले होते.
मात्र दुसरीकडे भारतींय जनता पक्षाच्या (BJP) वतीने राज्यातील सर्वच मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली जात आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले गेले आहेत. पक्षाच्या वतीने विधानसभा मतदारसंघनिहाय बूथस्तरावर केलेल्या कामाचा आढावा घेतला जात आहे. भारतीय जनता पक्षाने हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुक प्रमुख म्हणून रामदास पाटील सुमठानकर यांची नियुक्ती केली असून संभाव्य उमेदवारामध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 12 डिसेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर 30 डिसेंबररोजी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. `विकसित भारत संकल्प यात्रे`चे निमित्त असले तरी तब्बल दोन दिवस त्यांचा हिंगोली जिल्हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते कळमनुरी, औंढा नागनाथ येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष आणि त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री यांचा दौरा झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. ही सर्व तयारी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी असण्याची शक्यता असून यानिमित्ताने संभाव्य उमेदवाराची चाचपणी केली जात असल्याची चर्चा रंगत आहे. तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचेही नाव संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जात आहे. एकूणच या तयारीमुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि त्यांचे समर्थक मात्र धास्तावले आहेत.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.