Nanded BJP News : आगामी आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ संपलेले नाही. नांदेडमधून लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून चार नावांची चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि डाॅ. मीनल खतगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यापुर्वी प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी फिक्स समजली जात होती. मात्र चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात व देशात भाजपसह महायुती मोदी गॅरंटीवर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता आणू पाहत आहे. पण सध्या नांदेडमध्ये चर्चा आहे, ती भाजपकडून उमेदवारीची गॅरंटी चिखलीकरांना मिळणार की मग खतगांवकरांना? याचीच. भाजप धक्कातंत्र वापरून कोणाची उमेदवारी कापून कोणाला देईल, याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता येत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील दहा ते बारा खासदारांचे रिपोर्ट कार्ड बरोबर निवडून येण्या योग्य नसल्याचा शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक मतदारंसघात भाजप विद्यमान खासदारांना नारळ देण्याची शक्यता आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपा नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नांदेडमध्ये भाजपचा खासदार असल्यामुळे सहाजिकच महायुतीत ही जागा त्यांच्या वाट्याला येणार आहे.
गेल्या निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय चिखलीकर यांनी खेचून आणला होता. त्यामुळे आपली उमेदवारी फिक्स असल्याच्या अंदाजात त्यांनी तयारीही सुरू केली आहे. पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व काँग्रेसमधील समर्थकही पक्षात आले आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील सत्तेत चव्हाण यांच्या रुपाने मोठा वाटेकरी निर्माण झाल्याने निष्ठावंताच्या पोटात गोळा उठला आहे.
त्यातच लोकसभेच्या उमेदवारीसाठी चव्हाण यांनी डॉ. मिनल पाटील खतगावकर यांचे नांव पुढे करत थेट अमित शाहांशी त्यांची भेट घडवून आणली होती. चव्हाण यांच्यामुळे आपल्या उमेदवारीला धोका होऊ शकते हे ओळखून खासदार चिखलीकर यांनीही स्वतंत्रपणे आपला दावा मजबूत करण्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपने अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन केले.
आता आपल्यासोबत आलेल्या नातेवाईकांचेही बस्तान बसवण्याच्या कामाला ते लागले आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांना दिलासा देण्यासाठी मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी मिळवून देण्याचे आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपलचा दबदबा कायम ठेवण्यासाठी चव्हाणांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे नांदेडमधून लोकसभेची उमेदवारी भाजप कोणाल देणार? याची गॅरंटी सध्या तरी देता येत नाहीये.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.