Hingoli Lok Sabha News : आलटून पालटून खासदार देणारे हिंगोलीकर आता कोणाला देणार दिल्लीची संधी ?

Shivsena Politics News : महायुतीची भक्कम ताकद पाठीमागे असलेल्या बाबूराव कदम-कोहळीकार यांच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर निवडणूक लढवत आहेत.
Hingoli Lok Sabha Constituency
Hingoli Lok Sabha Constituency Sarkarnama

हिंगोली लोकसभा मतदारसंघाला एक इतिहास आहे. या मतदारसंघातून एकदा निवडून आलेला खासदार सलग दुसऱ्यावेळेस निवडून येत नाही. त्यामुळे यावेळेसच्या निवडणुकीत दोन शिवसैनिकांत लढत होत असून यामध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.

महायुतीची भक्कम ताकद पाठीमागे असलेल्या बाबूराव कदम-कोहळीकार यांच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) गटाचे नागेश पाटील आष्टीकर निवडणूक लढवत आहेत. या चुरशीच्या निवडणुकीत दोघांपैकी कोण एक जण दिल्लीला जाणार हे उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत विभागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ आहे. (Hingoli Lok Sabha News)

या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता हिंगोली विधानसभेवर भाजपचे (Bjp) तानाजी मुटकुळे यांचे वर्चस्व आहे. तर कळमनुरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर आमदार आहेत. वसमतमध्ये अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे आमदार आहेत. उमरखेड विधानसभेवर भाजपचे नामदेव ससाणे हे आमदार आहेत.

किनवट विधानसभेवर भीमराव केराम यांच्या रूपाने भाजपची सत्ता आहे. हदगावमध्ये अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभांवर भाजपचे आमदार आहेत तर एक शिंदे गट आणि एक अजित पवार गट असे सहापैकी 5 आमदार महायुतीचे आहेत, तर कॉंग्रेसचा एकमेव आमदार आहे.

कळमनुरीत आमदार प्रज्ञा सातव यांच्या रूपाने कॉंग्रेसच्या (Congress) विधान परिषद आमदार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हिंगोली मतदारसंघात महायुतीचे पारडे जड वाटते. परंतु ऐनवेळी बदलेला उमेदवार, भाजपमधील खदखद, फोडाफोडीच्या राजकारणामुळे वाढलेला असंतोष यासह शेतकरी, बेरोजगार तरुणांचा प्रश्न आणि मराठा आरक्षण याची झळ महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवाजी माने यांच्या रूपाने शिवसेनेला पहिला खासदार मिळाला. त्यानंतर सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील हे दोघेही शिवसेनेच्या उमेदवारीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. परंतु शिवसेनेत उभी फूट पडल्याने आता लोक कोणत्या शिवसेनेला पसंती देतात, हे पाहावे लागणार आहे.

शिवसेनेचे (Shivsena) आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील शिंदे गटात आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतही फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादीचे बळही कमी झाले. या फाटाफुटीत नेमका कोणाचा फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com