Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभाजीनगर, जालना दौऱ्यावर आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता दुष्काळाच्या संकटात आहे. अशावेळी त्यांना दिलासा, तातडीची मदत देण्याऐवजी आमचे कृषीमंत्री विदेशात फिरायला जातात, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरात घेतलेल्या टंचाई आढावा बैठकील कृषीमंत्री हजर राहत नाहीत, मग तुम्ही मंत्री कशाला झालात? अशा शब्दात वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) समाचार घेतला. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, एवढ्या उन्हात त्याला रांगा लावाव्या लागत आहेत. घामाने हैराण झालेल्या शेतकऱ्यावर इतकी संकटं असताना हे बाहेर जातातच कसे?
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुमच्या विभागात मुख्यमंत्री येऊन बैठका घेतात त्यालाही तुम्ही मंत्री म्हणून उपस्थित राहिला नाहीत. मग तुम्ही मंत्री कशाला झालात? फक्त टक्केवारी घेण्यात तुम्ही व्यग्र आहात का? अशा प्रश्नांचा भडीमार वडेट्टीवार यांनी केला. जालना आणि संभाजीनगर दौऱ्यावर असताना वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेली त्यांनी दुष्काळ आणि पुण्यातील अपघात प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा माणूस म्हणजे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आहे. चुकीला माफी नाही म्हणत त्यांनी स्वत:ची चूक सर्वांसमोर मान्य केली. मात्र, आता मनुस्मृतीला मानणारा भाजप त्याचे भांडवल करत आहे. बाबासाहेबांबद्दल खरंच यांच्या मनात सन्मान आहे का? असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपच्या पोटात एक आणि ओठात दुसरंच असल्याचा टोला लगावला.
पुण्यातील अपघात प्रकरणात आठ तास गुन्हा दाखल होत नाही, रक्ताचे नमुने बदलले जातात याचाच अर्थ पोलिस आणि आरोग्य विभाग राजकीय दबावाला बळी पडतोय. मग या प्रकरणातील सत्यता काय? हा खरा प्रश्न आहे. डॉ. अजय तावरेला निलंबित करा म्हणून तत्कालीन वैद्यकीय संचालक म्हैसेकर यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला. गेल्या दहा वर्षांपासून अजय तावरेची बदली झालेली नाही. याचाच अर्थ त्याला कुणाचा तरी राजाश्रय त्याला आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पंचनामे होतात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. संभाजीनगर मध्ये 1561 गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात झाल्यात. 267 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. अनेक भागात 15-15 दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. उद्या नाना पटोले हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.
जालना जिल्ह्यातील जवखेडा गावात कुंभार समाजाच्या कुटुंबासाठी मी मुद्दाम आलोय. बँकेचा कर्मचारी शेतकऱ्याला कर्ज मिळवण्यासाठी लाच मागतो, हे दुर्दैव आहे , असेही वडेट्टीवार म्हणाले. हे सरकार फक्त टक्केवारी आणि टेंडर घेण्यामध्येच व्यग्र आहेत. त्यांनी निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे परवानगी मागून 25,000 कोटीचे टेंडर काढल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. गेल्या चार महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली. यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार काहीच करत नाही. आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारकेडीही आमची मागणी आहे की, या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. त्यांना मोफत बियाणं द्यावं, वीज बिल माफ करावे तसेच जी कर्जवसुली सुरू आहे तिला स्थगिती द्यावी. आज जनावरांना चारा नाही, पाणी नाही त्यामुळे सर्व जनावरांना सरकारने चारा-पाणी उपलब्ध करून द्यावा. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जनता टाहो फोडत असतानाही टक्केवारी घेण्याचे काम या नतदृष्टांकडून होत आहे, असा हल्लाबोल त्यांनी मुंडेंवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.