

Shivsena UBT-AIMIM News : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. निमित्त संजय शिरसाट यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरण अन् त्याच्या पुराव्याचे असले तरी त्याचवेळी या दोन्ही पक्षात काही तरी शिजंत असल्याची चर्चा होती.
आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर एमआयएमने पुन्हा उद्धवसेनेला एकत्र येण्यासाठी टाळी दिली आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभूत करायचे असेल तर एकत्र येऊ, अशी ऑफर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मात्र एमआयएम आणि शिवसेनेची विचारसरणी कधीच एक होऊ शकत नाही. तो पक्ष जातीयवादी आहे.
मुस्लिम मतदारांची मालकी इम्तियाज जलील किंवा त्यांच्या पक्षाकडे नाही. मुस्लिमांची मते महाविकास आघाडी आणि आमच्या पक्षालाही मिळू शकतात, मिळतात असा दावा अंबादास दानवे यांनी केला. केवळ निवडणुका जिंकायच्या म्हणून आम्ही विचार सोडणार नाही. शिंदेंची शिवसेना-भाजप यांना आम्हीही पराभूत करू शकतो. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करतो असे मानण्याचे मुळीच कारण नाही. त्यामुळे एमआयएमच्या आॅफर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील एका पक्षाने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील काही मोजक्या महापालिकांमध्ये एमआयएमला सोबत घेण्याचा प्रस्ताव आम्हाला दिल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला. यावरही आमच्याकडून कुणीही एमआयएमला प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेने तर मुळीच नाही, इतर कोणत्या पक्षाने एमआयएमशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती मला नसल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएमवर जातीयवादी पक्ष असल्याचे सांगत त्यांची ऑफर धुडकावली. यावर इम्तियाज जलील यांनी दानवे यांनी आमच्यावर जातीयवादी असल्याचे आरोप करतांना एकदा स्वतःच्या पक्षाकडे बघावे. ज्यांनी सहा डिसेंबर रोजी शौर्यदिन साजरा केला, त्यांनी हिमंत असेल तर मुस्लिम भागात जाऊन आम्ही बाबरी पाडली हे सांगावे, असे आव्हानच इम्तियाज जलील यांनी अंबादास दानवे यांना दिले.
दरम्यान, मुंबई महापालिकेत नवाब मलिक(Nawab Malik) यांचे निमित्त पुढे करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्याची खेळी भाजप आणि शिवसेनेने केली आह, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी 'मुसलमानो होश मे आओ', असा सावधानतेचा इशारा दिला आहे. मुसलमानों होश में आओ! कब तक बेवकूफ बनते रहोंगे! बीएमसी निवडणुकीत भाजपने नवाब मलिकचे खोटे निमित्त सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारपासून स्वतःला दूर ठेवणे ही सत्ताधारी पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम मते मिळविण्याची एकत्रित रणनीती आहे.
भाजप आणि शिवसेना दोघांनाही माहित आहे की मुस्लिम त्यांना मतदान करणार नाहीत म्हणून ते दादाच्या माध्यमातून समुदायाची मते वळवत आहेत. नवाब मलिक अंडरवर्ल्ड प्रकरण हा गेमप्लॅनचाच एक भाग असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.