Chhatrapati Sambhajinagar: एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे या वेळी मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवणार, अशा वावड्या मध्यंतरीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे स्वतः इम्तियाज यांनीच हे सांगितले होते. अखेर हा एमआयएमचा स्टंट होता आणि इम्तियाज जलील, पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडूनच ही पुडी सोडण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (Chhatrapati Sambhajinagar loksabha 2024) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल हैदराबादेत स्वतःसह इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा या मतदारसंघातून अनपेक्षित विजय झाला होता. दलित-मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा पाऊस आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या हक्काच्या हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेली फूट इम्तियाज यांच्या पथ्यावर पडली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्यावेळी सोबत असलेली वंचित आघाडी आता एमआयएमचा मित्रपक्ष राहिलेली नाही, त्यामुळे एमआयएमच्या अडचणी वाढल्या आहेत. तरीही महायुती-महाविकास आघाडीतील थेट लढत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तगडा अपक्ष उमेदवार उभा राहण्याची शक्यता गृहीत धरून एमआयएमने पुन्हा नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय संभाजीनगरची जागा एमआयएमने जिंकलेली असल्यामुळे साहजिकच त्यांनी ती लढवणे क्रमप्राप्त ठरते.
इम्तियाज जलील यांनी आपल्या पाच वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सत्ताधारी व इतर विरोधकांच्या विरोधात रान पेटवत लक्ष वेधले आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये इम्तियाज जलील यांचे नाव आहे. परंतु अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेच्या निमित्ताने मुंबईच्या मीरा-भाईंदर भागात घडलेल्या राड्याचा राजकीय लाभ उचलण्याच्या दृष्टीने इम्तियाज जलील व त्यांच्या एमआयएम पक्षाने मुंबईतून लोकसभा लढवता येते का? याची चाचपणी केली होती.
प्रसारमाध्यमांमध्येही याची मोठी चर्चा ओवेसी-इम्तियाज यांनी घडवून आणली होती. मात्र, ही अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इम्तियाज जलील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खुद्द इम्तियाज जलील यांनी दिली होती. मुंबईच्या मीरा भाईंदर भागात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वाहन रॅलीत राडा केल्यामुळे काही दिवसांनी या भागातील मुस्लिमांची अतिक्रमणे आणि घरांवर महापालिकेने बुलडोझर फिरवला होता.
या कारवाईच्या वेळी मुंबईतील कुठलाही राजकीय पक्ष जो स्वतःला मुस्लिम अल्पसंख्याकांचा मसिहा म्हणवून घेतो तो फिरकला नाही. त्यावेळी अनेकांनी खासदार इम्तियाज जलील, असदुद्दीन ओवेसी यांना फोन करून मदतीसाठी या, अशी साद घातली होती. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर या मुंबईतील मुस्लिमबहुल भागात नशीब आजमावण्यासाठी इम्तियाज जलील यांनी 'चलो मुंबई'चा नारा दिला होता
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.