नगरपालिका आखाड्यात आमदार संदीप क्षीरसागरांची तयारी काय; उपनगराध्यक्ष बंधूही फारसे दिसेनात

आताही सामान्य बीडकर व तरुणांच्या बळावर पुन्हा ५२ पैकी सहज २५ पार करु, असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
Sandeep kshirsagar
Sandeep kshirsagarsarkarnama

बीड : पाच वर्षांपूर्वी ऐन नगर पालिका निवडणुकीतच (Municipal elections) आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep kshirsagar) यांनी आपल्या मातब्बर काकांना आव्हान दिले आणि त्यांच्या पालिकेच्या सत्ता किल्ल्यातही प्रवेश केला. मात्र, या निवडणुकीसाठी आमदार क्षीरसागर यांची रणनिती नेमकी काय आहे, असा प्रश्‍न आहे. विरोधकांनी निवडणुकीचा शंखनाद केलेला असतानाच त्यांचे उपगनराध्यक्ष बंधू हेमंत क्षीरसागर देखील फारसे सक्रिय झालेले दिसत नाहीत. तरीही पुन्हा बाजी आमचीच असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

क्षीरसागरांच्या पुर्वीच्या राजकीय वाटचालीत विधानसभेला जयदत्त क्षीरसागर तर ग्रामीण भाग गजानन कारखाना रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे आणि पालिका कार्यक्षेत्रात डॉ. भारतभूषण क्षीरसागर अशा अखिलीत राजकीय वाटण्या ठरल्या होत्या. याच समीकरणानुसार वडील रवींद्र क्षीरसागर यांच्यानंतर ग्रामीण राजकारणात एंट्री करत संदीप क्षीरसागर पाच वर्षे पंचायत समितीचे सभापती व पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती राहिले. मात्र, मागच्या पालिका निवडणुकीत त्यांना समर्थकांच्या माध्यमातून बीड पालिका कार्यक्षेत्रात एंट्री हवी होती. क्षीरसागरांमध्ये राजकीय दरी निर्माण होण्यात हाच कळीचा मुद्दा ठरला आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा 'काका-पुतणे' आमने सामने आले. अगदी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीत उतरत संदीप क्षीरसागर दोन्ही काकांना चांगलेच पुरुन उरले.

Sandeep kshirsagar
स्मशानभूमीच्या उद्‌घाटनाला बोलावले की मला धडकीच भरते : फडणवीसांनी सांगितला तो किस्सा!

थेट नगराध्यक्षपदासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर व रवींद्र क्षीरसागर या सख्ख्या भावंडांमध्ये झालेल्या लढतीत संदीप क्षीरसागरांचे वडिल पराभूत झाले. मात्र, नगरसेवकांच्या संख्येची विशी पार करण्यात यश आलेल्या संदीप क्षीरसागर यांनी एमआयएमचा एक गट गळाला लाऊन बंधू हेमंत क्षीरसागर यांना उपाध्यक्ष केले. इतर विषय समित्यांच्या निवडणुकांतही बाजी मारली. नंतर त्यांच्या आघाडीच्या तंबूतून एकेक शिलेदाराने काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मात्र, पालिका निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बीड शहरातील मतदारांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा संदीप क्षीरसागर यांच्यात पारड्यात अधिक वजन टाकले. विधानसभेतील त्यांचा मार्ग बीड शहरामुळेच सुकर झाला. परंतु, हळूहळू पालिकेतील अनेक त्यांचे सवंगडी त्यांचे बोट सोडून काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या फौजेत दाखल झाले. बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्याकडील स्वच्छता सोडता इतर सर्व समित्याही त्यांच्या हातून निसटल्या. आमदार झाल्याने सामान्य बीडकरांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. तसे पाहता बिंदुसरा नदीवरील पुल कम बंधारा, पेठ बीड भागाला जोडणारा पुल, शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अशा विषयांवर त्यांचा पाठपुरावाही सुरु आहे. मात्र, अद्याप कामांना मुर्तस्वरुप मिळालेले नाही.

याच सगळ्या धावपळीत आता पालिका निवडणुकीचे रणांगण तापत आहे. नगराध्यक्ष काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून लॉंचिंगही केले आहे. पालिकेच्या माध्यमातून कामांचे भूमिपुजन आणि उद॒घाटनांच्या सपाट्यासह नेहमीप्रमाणे 'पर्याय नाही' अशी 'माऊथ पब्लिसीटी' करणारी त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही निवडणुकीच्या पायाभरणीसाठी मोर्चाचे रणशिंग फुंकून शहरात 'खड्डेमय रस्ते' आणि 'तुंबलेल्या नाल्यां'ची बॅनरबाजी सुरु केली आहे. पण, याच वेळी आमदार क्षीरसागर यांच्या तंबूत फारशी हालचाल दिसत नाही. त्यांना साथ देणाऱ्या पालिकेतील सवंगड्यांप्रमाणे काही माजी आमदारांनीही त्यांच्यापासून 'दो गज दुरी'ची भूमिका घेतली आहे.

Sandeep kshirsagar
काकांच्या विचारधारेला तिलांजली देणे योग्य वाटले नाही; सत्तेपुढे न झुकता स्वाभिमानाने लढलो...

अष्टप्रधान मंडळातील 'सल्लागारां'च्या कोंडाळ्यामुळेच शिलेदार दुरावत असल्याचे बोलले जात असताना सोडून गेलेल्यांना 'पर्याय देखील शोधण्याची तसदी नको, जनता सोबत आहे' असा अहवालच सल्लागारांनी दिला की काय असा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात रणधुमाळी जोरात असतानाच त्यांचे उपनगराध्यक्ष बंधू हेमंत क्षीरसागर देखील फारसे आखाड्यात आढळत नाही. मात्र, शहरातील तरुण फळीमध्ये आमदार क्षीरसागरांची क्रेझ अजूनही आहे. वरुन तयारी दिसत नसली तरी मागच्या वेळी कोणतेच पद नसताना विशी पार केली होती, आताही सामान्य बीडकर व तरुणांच्या बळावर पुन्हा ५२ पैकी सहज २५ पार करु, असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. आता संदीप क्षीरसागर कोणते डाव टाकतात, हे पाहणेही औत्स्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी चेहरा म्हणून हेमंत क्षीरसागर कि माजी आमदार सय्यद सलिम यांना पुढे केले जाते, यावरही मोठे गणित अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com