पिंपरी : माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारी (ता. ३ डिसेंबर) ४४ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उदघाटनासाठी लोणावळा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी स्मशानभूमीचे उदघाटन केले. मात्र, मला स्मशानभूमीच्या उदघाटनाची भीती वाटते, असे त्यांनी सांगितले. त्याचा किस्सा त्यांनी यावेळी कथन केला. (I am afraid of inauguration of the cemetery : Devendra Fadnavis)
पुण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनासह पुण्यातील इतर कार्यक्रमांसाठी फडणवीस शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात लोणावळ्यापासून झाली. लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, महात्मा जोतिराव फुले, संत गाडगे बाबांच्या समूहशिल्पाचे त्यांच्या हस्ते या वेळी लोकार्पण करण्यात आले.
स्मशानभूमीच्या भीतीचा किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले की, नागपूरचा महापौर असताना विरोधी पक्षनेत्याच्या प्रभागातील स्मशानभूमीच्या उदघाटनासाठी मला बोलविण्यात आले होते. त्यावेळी मला स्मशानभूमीतील प्रेताला अग्नी देण्यास सांगितले होते. तेव्हापासून स्मशानभूमीच्या उदघाटनाला कोणी बोलवले की मला धडकीच भरते. त्यांचा हा किस्सा ऐकून एकच हशा पिकला. मात्र, येथे तुम्ही माझ्या हाती चूड देत नागपूरसारखी वेळ आणली नाही, असे म्हणताच पुन्हा हास्यस्फोट झाला.
लोणावळा शहरास १०० कोटी रुपयांचा निधी आपल्या डबल इंजिन सरकारने दिला होता. गेल्या २५ वर्षांत एवढा निधी दिला गेला नव्हता, असा दावा फडणवीस यांनी या वेळी केला. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या विचारांचे प्रकाशन थांबवल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. बाबासाहेबांचे हे विचार, त्यांच्या भाषणाचे प्रकाशन का कोणी थांबविले, याची चौकशी करावी आणि ते पुन्हा तातडीने प्रकाशित करण्याची मागणी त्यांनी केली. बाबासाहेबांची भाषणे, त्यांच्या विचारांचे साहित्यरूपी खंड राज्य सरकारच्या वतीने प्रकाशित केले जातात, त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा कागद पडून आहे; परंतु वेळ नाही. टेक्निक नाही. प्रॉब्लेम आहे अशी कारणे देत त्या खंडांचे प्रकाशन राज्य सरकारने थांबविले आहे. त्याची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतल्याबद्दल फडणवीसांनी आनंद व्यक्त केला.
स्वच्छतेत अग्रस्थान पटकावून राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर मोठे केल्याबद्दल लोणावळा नगरपरिषदेचे त्यांनी कौतुक केले. खंडाळा ते राजमाचीदरम्यान हजार कोटी रुपयांचा रोप वे करण्याच्या भेगडे यांनी केलेल्या मागणीसाठी केंद्रीय पर्यटन व पर्यावरण मंत्र्यांकडे बैठक लावू. जेणेकरून लोणावळ्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळेल, येथील रोजगार वाढेल, असेही फडणवीस म्हणाले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.