Parbhani Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ कोणाकडे असेल याबाबतची उत्सुकता संपण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना आणि बीड या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच यामध्ये परभणीचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
2019 च्या निकालाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या जागेसाठी आग्रह धरलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. 2024 च्या निवडणुकीला सामोरे जाताना विटेकर यांना भारतीय जनता पक्षाची साथ मिळणार आहे. पक्षातील एक गट विटेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रार्थना करत असल्याचीही चर्चा आहे. तसेच शिवसेना शिंदे गटही सोबतीला असणार आहे.
मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात महायुती सरकारविषयी नाराजीचा सूर आहे. परंतु विटेकर यांच्याविषयी मराठा समाजात साॅफ्ट कॉर्नर असल्याने त्याचा फायदा विटेकर यांना मिळू शकतो. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचाही मुद्दा महायुतीच्या उमेदवाराला फायद्याचा ठरू शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी व विटेकर यांच्यात राजकीय मतभेदाची पार्श्वभूमी आहे.
विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर दुर्राणी यांच्यासाठी शुभशकून समजला जाईल. विटेकर विजयी झाले तर पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी दुर्राणी दावा करू शकतात. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे रासपमध्ये आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी गुट्टे यांचे स्नेहपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले आहे. तसेच राजेश विटेकर व गुट्टे यांनी आघाडी करत गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता प्राप्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याउलट संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासोबत गुट्टे यांच्यात जाहीर कार्यक्रमांमध्ये खटके उडालेले आहेत. जाधव यांनी गंगाखेड मध्ये गंगाखेड शुगर्स संदर्भात शेतकरी मोर्चा काढला होता. गुट्टे यांची भूमिका गुलदस्त्यात असली तरी ते मैत्रीधर्म निभावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे जाधव यांच्या मदतीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबतीला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीमधील समावेशाबाबत अद्याप संभ्रम आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढली तर ते महाविकास आघाडीसाठी धोक्याचे चिन्ह असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.