Jalna: लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीतील भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे महाविकास आघाडी व वंचित मध्येही जागावाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे.
मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेस यावेळी लढवू इच्छित नाही, या बदल्यात त्यांना हिंगोलीची जागा हवी आहे. स्वतः काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या जागेसाठी आग्रही आहेत. शिवाय जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस गेल्या सहा निवडणुकांपासून पराभूत होत आली आहे. दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत.
इतक्या प्रदीर्घ काळापासून या लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांची मजबूत पकड पाहता महाविकास आघाडी दानवें विरोधात कोणाला उमेदवारी द्यावी हे अजून ठरवू शकलेली नाही. जालन्याची जागा उद्धव ठाकरे यांना देऊन हिंगोलीत मजबूत असलेल्या काँग्रेसने तिथून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हिंगोलीची जागा ही ठाकरे गटाकडे असल्यामुळे अडचणी आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवाय शिवसेना-भाजपची 25 वर्षे युती असल्यामुळे जालना लोकसभेची जागा कायम भाजपच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची ताकद कमी आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील मोठे नेते व रावसाहेब दानवे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे अर्जुन खोतकर सध्या शिंदेसेनेसोबत आहेत.
रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात ठाकरे गटाला जालन्यात उमेदवार सापडणे तसे अवघडच. त्यामुळे हक्काची हिंगोलीची जागा लढवून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात गद्दारी केल्यामुळे असलेला रोष कॅश करून ती जिंकणे ठाकरे गटाला अधिक सोपे वाटते. त्यामुळे जालना मतदारसंघातून लढण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही इच्छुक नाहीत.
राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तर त्यांचे एकमेव आमदार राजेश टोपे यांचीही लोकसभा लढवण्याची अजिबात इच्छा नाही. यापुर्वी जागावाटपाच्या बैठकीत तसे टोपे यांनी स्पष्टही केले होते. त्यामुळे सध्या तरी भाजपच्या रावसाहेब दानवे यांना मैदान मोकळे आहे. जालन्यातून उमेदवार मिळाला नाही तर इतर ठिकाणाहून उमेदवार आयात करण्याच्या हालचालीही महाविकास आघाडीमध्ये सुरू असल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.