Raosaheb Danve-Babanrao Lonikar : रावसाहेब दानवे अन् बबनराव लोणीकर यांच्यात युती; खोतकर, जेथलियांना टेन्शन

Partur Local Body Election 2025 : रावसाहेब दानवे आणि लोणीकर यांच्यातून विस्तवही जात नाही ही गेल्या अनेक वर्षांची परिस्थिती यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बदलण्याचे चित्र दोघांनीही एकत्र येत निर्माण केले आहे.
BJP Leader Raosaheb Danve-MLA Babanrao Lonikar Alliance In Partur News
BJP Leader Raosaheb Danve-MLA Babanrao Lonikar Alliance In Partur NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जालन्यात रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी एकत्र येत स्थानिक राजकारणात नवा समीकरण निर्माण केले.

  2. या युतीमुळे अर्जुन खोतकर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

  3. भाजपमधील अंतर्गत गटबाजी या नव्या समीकरणामुळे कमी होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत या युतीचे मोठे परिणाम दिसू शकतात.

Jalna Politics : जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी- महायुती ही या निवडणुकांमध्ये कुठे जमली तर कुठे बिघडली, अशी परिस्थिती आहे. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारण आणि ते करणारे नेते यांनाही या निवडणुकीत वर्षानुवर्षांचे मतभेद विसरून तडजोडी कराव्या लागत आहेत. गेल्या 35-40 वर्षापासून राजकारणात आणि एकाच पक्षात असलेल्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वाद मिटल्याचा दावा करत एका जाहीर कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांना आलिंगन दिल्याचे चित्र पहायला मिळाले.

भाजपच्या राजकारणात दोघांचाही दांडगा अनुभव आणि प्रदीर्घ कारकीर्द राहिली आहे. परंतु एका म्यानात दोन तलवारी ठेवता येत नाही अशी काहीशी परिस्थिती दानवे आणि लोणीकर यांच्या बाबतीत झाली होती. लोकसभेसाठी लोणीकर यांचा परतुर मतदार संघ हा परभणीला जोडला गेला आहे. त्यामुळे लोणीकरांचे जालन्यातील वर्चस्व किंवा हस्तक्षेप रावसाहेब दानवे यांना कदापिही मान्य नव्हता. यावरून या दोन नेत्यांमध्ये अनेकदा संघर्ष झडल्याची उदाहरणे आहेत. विशेषत: जिल्हा परिषद,आधीच्या नगरपरिषद आणि संघटनात्मक रचनेत रावसाहेब दानवे यांचा कायम वरचष्मा राहिला आहे.

जिल्हा बँकेच्या राजकारणातही रावसाहेब दानवे यांनी अनेकदा लोणीकर यांच्यावर कुरघोडी केली. जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून गेल्या वर्षी मोठा वाद निर्माण झाला होता. रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजेच आमदार संतोष दानवे आणि युवा मोर्चाचे राहुल लोणीकर यांनीही पुढे सुरू ठेवला. जालना जिल्ह्यामध्ये कायम समांतर संघटना चालवल्या जात असल्याचे चित्र दोन्ही बाजूंनी होते. रावसाहेब दानवे आणि लोणीकर यांच्यातून विस्तवही जात नाही ही गेल्या अनेक वर्षांची परिस्थिती यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बदलण्याचे चित्र दोघांनीही एकत्र येत निर्माण केले आहे.

BJP Leader Raosaheb Danve-MLA Babanrao Lonikar Alliance In Partur News
Raosaheb Danve News : मित्र पक्षाला शत्रू समजू नका, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवेंकडून युतीसाठी पुढाकार!

आता ते किती प्रामाणिक आणि निवडणुकीत किती एक दिलाने काम करतात यावर अवलंबून असणार आहे. जालना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते. नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर जालन्यात पहिला महापौर भाजपाचा बसवण्याचा चंग रावसाहेब दानवे यांनी बांधला आहे. यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी असलेल्या कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश देत दानवे यांनी खोतकर यांची चांगलीच कोंडी केली.

BJP Leader Raosaheb Danve-MLA Babanrao Lonikar Alliance In Partur News
Babanrao Lonikar: "मृत्यूनंतरही माझी हाडं म्हणतील..."; शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधानानंतर लोणीकरांची सारवासारव

यावर मात करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि राजकारणातील 40 वर्षांपासूनचे सहकारी असलेल्या भास्कर आंबेकर यांचा पक्षप्रवेश करून घेतला. अर्जुन खोतकर यांची ताकद वाढत आहे हे पाहताच रावसाहेब दानवे यांनी आता आणखी एक नवा डाव टाकला. तो म्हणजे बबनराव लोणीकर यांच्याशी जुळवून घेत महापालिकेसोबतच जिल्हा परिषदही आपल्याच ताब्यात ठेवण्याचा. चाळीस वर्षातील राजकीय वैर विसरून दानवे आणि लोणीकर खरंच मनापासून एकत्र आले असतील तर याचा निश्चितच चांगला परिणाम केवळ जालना जिल्ह्याच्या राजकारणातच नाही तर शेजारच्या परभणी जिल्ह्यातही होईल.

लोणीकर विधानसभा लढवणार नाहीत..

बबनराव लोणीकर यांनी आपण यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे याआधीही जाहीर केले आहे. सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आता लोणीकर लोकसभेत जाऊ इच्छित आहे. परभणी मतदार संघातून 2024 मध्येच त्यांनी दावा केला होता. परंतु महायुतीमध्ये ही जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लोणीकरांना संधी मिळाली नाही. मात्र 2029 ची तयारी डोळ्यासमोर ठेवून लोणीकरांची वाटचाल सुरू आहे.

एकूणच रावसाहेब दानवे आणि लोणीकर यांच्या एकत्र येण्याने जालना जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळू शकते. याला शिंदे यांची शिवसेना आणि अर्जुन खोतकर कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी विधानसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत नगर परिषदेसाठी कंबर कसली आहे. कालच अजित पवार यांचा परतूरमध्ये दौरा झाला. सत्ता हातात द्या, निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी परतूरकरांना दिले. त्यानंतर लगेच दानवे आणि लोणीकर यांच्यात दिलजमाई झाली. आता हा निव्वळ योगायोग आहे की मग हे दोघे मनाने एकत्र आले हे निवडणूक निकालानंतर दिसून येईल.

FAQs

1. जालन्यात दानवे-लोणीकर युती का चर्चेत आहे?

स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता असल्याने ही युती चर्चेत आहे.

2. या युतीचा अर्जुन खोतकरांवर काय परिणाम होऊ शकतो?

खोतकरांचा राजकीय प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते.

3. भाजपमध्ये गटबाजी वाढण्याची शक्यता आहे का?

नाही, या युतीमुळे अंतर्गत गटबाजी कमी होऊ शकते.

4. ही युती आगामी निवडणुकांवर परिणाम करेल का?

नक्कीच, जालना जिल्ह्यातील उमेदवारी आणि प्रचार आराखड्यावर मोठा प्रभाव दिसू शकतो.

5. स्थानिक पातळीवर कोणता नवा समीकरण पाहायला मिळू शकतो?

दानवे-लोणीकर विरुद्ध खोतकर असे दोन प्रमुख गट तयार होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com