Jalna News : काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांना शासकीय कार्यक्रमातून डावलण्याचे आणि निमंत्रण पत्रिकेतून त्यांचे नाव वगळण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामकरण सोहळ्यात खासदार काळे यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकली. परंतु या सोहळ्याचे निमंत्रणच काळे यांना प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात आले नव्हते.
यावरून खासदार काळे (Kalyan Kale) यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून लेखी खुलासा मागितला होता. यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी खासदार कल्याण काळे यांची माफी मागून यापुढे असा प्रकार घडणार नाही, आपल्यावर राजकीय दबाव होता असे म्हणत शरणागती पत्करली. हे प्रकरण थंड होत नाही तोच पुन्हा राजूर संस्थानच्या धार्मिक कार्यक्रमात काळे यांना डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
राजुर संस्थानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि संत नामदेव महाराज चरित्र कथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. (Congress) मात्र या कार्यक्रमाची कुठलीही माहिती पूर्वकल्पना खासदार काळे यांना देण्यात आलेली नाही.
शिवाय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिकेवर काळे यांचे नावही टाकण्यात आलेले नाही. यावरून संतप्त झालेल्या खासदार कल्याण काळे यांनी भोकरदन चे तहसीलदार तथा राजुर संस्थांचे अध्यक्ष यांना थेट पत्र पाठवून जाब विचारला आहे. लोकप्रतिनिधी कायद्याचे आपण उल्लंघन केल्याचा आरोप करत 48 तासात व्यक्तिशः खुलासा करा, असे खासदार काळे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
लेखी खुलासा सादर केला नाही तर आपले यावर काहीच म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात येईल, असा इशाराही कल्याण काळे यांनी दिला आहे. एकूणच जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमातून खासदार कल्याण काळे यांना डावलण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. यामागे नेमकं कोण आहे? याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.