Killari News : गाजावाजा करत मोळी टाकली, मात्र 'किल्लारी'चे गाळप सुरूच झाले नाही...

Killari Cooperative Sugar Factory : कारखाना दहा वर्षांपासून बंद असल्याने यंत्रसामग्रीत बिघाड झालेला आहे.
Killari Cooperative Sugar Factory
Killari Cooperative Sugar Factory Sarkarnama
Published on
Updated on

गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेला किल्लारी (ता. औसा, जि. लातूर) येथील किल्लारी सहकारी साखर काऱखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ २५ नोव्हेंबर रोजी मोळी टाकून करण्यात आला, मात्र उसाचे गाळप अद्याप सुरू झालेले नाही. यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती न करताच घाईघाईने गाळप हंगाम सुरू केल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांवर हे सकंट ओढवले आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कारखाना सुरू झाला होता. मोळी टाकताना मोठा गाजावाजा करण्यात आला होता.

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की वॉटर टँकची आॅर्डर दिली होती. ती यायला उशीर झाला. वॉटर टँक आले असून, आता पुढील एक ते दोन दिवसांत कारखान्यात गाळप सुरू होईल. कारखाना सुरू व्हावा, कार्यक्षेत्रातील शेतकरऱ्यांची सोय व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. आज सायंकाळी कारखान्याला भेट देऊन आढावा घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली होती. कारखाना सुरू करण्यामागे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची तळमळ पाहून त्यांना मंत्री करावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकणार असल्याचे नरेंद्र महाराजांनी म्हटले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यामुळे आमदार पवार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखाना सुरू करत आहे, त्यामुळे विरोध करू नये, अशी विनंती केली होती. त्यानुसार जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मोळी टाकण्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला होता. नरेंद्र महाराजांनीही आमदार पवारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.

कारखाना दहा वर्षांपासून बंद होता. त्यामुळे यंत्रसामग्रीची देखभाल झालेली नव्हती. देखभाल-दुरुस्ती न करता गाळप हंगाम सुरू करण्याची घाई करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून असे करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक मंडळाचे अध्यक्ष केशव ऊर्फ बाबा पाटील यांनीही अशीच घाई करत कारखाना सुरू केला होता, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्या प्रशासक मंडळातील सदस्य किशोर साठे यांनी त्यावेळी देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून अध्यक्षांसोबत त्यांचा वाद झाला होता. बॉयलरचे मेन्टेनन्स झाल्याशिवाय कारखाना सुरू करू नये, असे साठे यांचे म्हणणे होते. त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले. लातूर, धाराशिव जिल्ह्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी आमदार पवार, आमदार चौगुले आणि संताजी चालुक्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकरी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बरखास्त प्रशाकीय मंडळाच्या सदस्यांना बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाला बोलावण्यात आले. त्यावेळी किशोर साठे उपस्थित राहिले. बॉयलरचे मेन्टेनन्स आणि अन्य यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती झाली का, अशी विचारणा त्यावेळी केली होती, थोडे काम राहिले आहे, असे सागण्यात आले होते, अशी माहिती साठे यांच्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी 'सरकारनामा'ला दिली.

Killari Cooperative Sugar Factory
Pune News: गुजरातच्या त्या 'शहा'नं पुणेकराला सव्वा कोटीला गंडवलं अन् कोर्टालाही फसवलं

मोळी टाकून दहा दिवस झाले तरी कारखाना अद्याप बंदच आहे. एका टँकला गळती लागली असून, अन्य बिघाडही झाल्याचे सांगितले जात आहे. दहा वर्षांपासून बंद असल्यामुळे कारखान्याच्या यंत्रसामग्रीत मोठा बिघाड झाला आहे. तत्कालीन प्रशासक मंडळांनीही गुडघे टेकले होते. काऱखान्यावर विविध बँकांचे जवळपास ३० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना सुरू करणे शेतकऱ्यांसाठी किती गरजेचे आहे, ही बाब आमदार पवार, आमदार चौगुले आणि चालुक्य यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर प्रशासक मंडळ बरखास्त करून दोन शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सभासदांची बैठक घेतली. कारखाना शेतकऱ्यांचाच राहावा, सहकारी तत्त्वावर चालावा, यासाठी आमदार पवार, चौगुले यांनी शेतकऱ्यांना साकडे घातले. त्यानंतर शेअर्सच्या माध्यमातून जवळपास पावणेदोन कोटी रुपये जमा झाले. आता कारखाना कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकरी, कर्मचाऱ्यांना लागली आहे.

Edited by: Mangesh Mahale

Killari Cooperative Sugar Factory
Nagar Politics : काळेंना पुन्हा आमदार व्हायचंय..! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या माध्यमातून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com